शिक्षक करणार मोबाईलवरून शाळांचा ’हवाई सर्व्हे’
By Admin | Updated: July 12, 2014 00:42 IST2014-07-12T00:42:45+5:302014-07-12T00:42:45+5:30
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी दोन शाळांमधील हवाई अंतर तपासण्याचे काम शिक्षकांकडे सोपविण्यात आले आहे.

शिक्षक करणार मोबाईलवरून शाळांचा ’हवाई सर्व्हे’
अमरावती : शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी दोन शाळांमधील हवाई अंतर तपासण्याचे काम शिक्षकांकडे सोपविण्यात आले आहे. हे अंतर मोबाईलवरील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोजावे लागणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे एक हजाराहून अधिक शाळांचा सर्व्हे होणार आहे. शैक्षणिक सत्र आता सुरू झाल्याने आगामी कालावधीत या कामाला शिक्षकांना जुंपले जाणार आहे.
राज्यात आतापर्यंत पहिली ते चौथी हा प्राथमिक तर पाचवी ते सातवी हा उच्च माध्यमिक स्तर मानला जात होता. त्यानुसार गावोगावी शाळा सुरू आहेत. यात चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुलांना आजही दुसऱ्या शाळेत जावे लागते. मात्र आता शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंत प्राथमिक स्तर म्हणून गणला जाणार आहे. चौथी किंवा सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळांना अनुक्रमे पाचवी आणि आठवीपर्यंत वर्ग चालविण्याची परवानगी देण्यात येत आहे. परंतु पाचवीपर्यंतच्या शाळेसाठी एक किलोमीटर आणि आठवीसाठी तीन किलोमीटर अंतरावर दुसरी शाळा नसावी असा नियम आहे. या नियमाच्या अनुषंगाने गुगल मॅपिंगच्या माध्यमातून हवाई सर्व्हे करण्यात येणार आहे.
तसे आदेश नुकतेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
हवाई सर्व्हे करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. अॅड्रॉईड मोबाईलवर हा सर्व्हे करण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागणार आहे. संबंधित शाळेत उभे राहिल्यानंतर त्या मोबाईलवर परिसरातील अन्य सर्व विभागाची माहिती मिळणार आहे. यामध्ये शाळांचे अक्षांस रेखांश मोजण्यात येणार आहे. त्यासाठी अॅड्रॉईड मोबाईल असलेल्या शिक्षक, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांना रेखांशाची माहिती नोंदवून घेतली जाणार आहे. त्यात नियमानुसार शाळा आढळल्या नाहीत, तर त्यांच्यावर रद्दची टांगती तलवार राहणार आहे. (प्रतिनिधी)