सोनुकले विद्यालयावर पालकांची धडक
By Admin | Updated: July 27, 2016 00:11 IST2016-07-27T00:11:36+5:302016-07-27T00:11:36+5:30
शिक्षकांकडून वारंवार होणारी अपमानजनक वागणूक, पिण्याचे पाणी, शौचालय बेपत्ता, शाळेला कुंपण नाही, ..

सोनुकले विद्यालयावर पालकांची धडक
नागरिकांचा संतापाचा उद्रेक : पाण्यात पाली, सुविधा बेपत्ता
परतवाडा : शिक्षकांकडून वारंवार होणारी अपमानजनक वागणूक, पिण्याचे पाणी, शौचालय बेपत्ता, शाळेला कुंपण नाही, आदी समस्यांबद्दल नजीकच्या वडगाव फत्तेपूर येथील शा. द. सोनुकले विद्यालयावर मंगळवारी सकाळी ११.३० वाजता संतप्त पालक धडकले. वडगाव फत्तेूर येथे अचलपूर येथील समर्थ शिक्षण शास्त्र संस्थेतर्फे १९६९ पासून शा. द. सोनकुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चालविण्यात येते. मात्र अलीकडे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसह विद्यार्थ्यांनी आवश्यक सुविधा पुरविण्यात कमालीचे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने पालकांमध्ये रोष निर्माण झाला. त्यामुळे मंगळवारी पालकांनी शिक्षकांना जाब विचारुन शाळा परिसराची पाहणी केली.
पाण्यात पाल आणि किडे
पिण्याच्या पाण्यासाठी शाळा आवारात लावण्यात आलेल्या टाकीमध्ये मृत पाल, किडे व घाण पाणी आढळून आले. मुलींच्या प्रसाधनगृहावर टिन नाहीत. मुलींची कुचंबणा होत आहे. मैदानात पाणी साचले आहे. शाळेला कुंपण नसल्याने शाळा परिसर असुरक्षित असल्याचा आरोप पालकांनी केला.
विद्यार्थ्यांना अपशब्दांचा वापर
तक्रार करणाऱ्या पालकांमध्ये भीमराव शनवारे, रामभाऊ गायन, किसन गायन, नारायण शनवारे, हिरु गायन, सुरेश गायन, राजू खडके, पांडूरंग खडके, पुरुषोत्तम गायन, रामभाऊ शेळके आदींनी केली आहे. मुख्याध्यापिका करूणा नगराळे यांनी यातून मार्ग काढण्याचे आश्वासन संतप्त पालकांना दिले. (प्रतिनिधी)