नऊ तालुक्यांत पोहोचली शालेय पाठ्यपुस्तके
By Admin | Updated: May 24, 2015 00:40 IST2015-05-24T00:40:51+5:302015-05-24T00:40:51+5:30
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या २ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.

नऊ तालुक्यांत पोहोचली शालेय पाठ्यपुस्तके
सर्वशिक्षा अभियान : जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचा समावेश
सुरेश सवळे चांदूरबाजार
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या २ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. आतापर्यंत नऊ तालुक्यांत पाठ्यपुस्तके पोहोचल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र पाठ्यपुस्तक महामंडळाकडून शिक्षण विभागाला प्राप्त झालेली पुस्तके सर्वशिक्षा अभियानमार्फत नऊ तालुक्यांत पाठविण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील २ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळावीत म्हणून सर्वशिक्षा अभियानाकडून याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यातील काही पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून अमरावती, भातकुली, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, चिखलदरा तालुक्यात पाठविण्यात आली आहेत. पुढील सत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशासोबत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. यापूर्वी शैक्षणिक सत्र आरंभ झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांनंतर तर कधी अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यानंतर पाठ्यपुस्तके मिळत होती. त्यामुळे अनेक विषयांचा अभ्यासदेखील होत नसल्याची ओरड होत होती.
शिक्षण विभागाकडून वेळेवर पुस्तके उपलब्ध होत नसल्याने पालकांना बाजारातून पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागत होती. ही परिस्थिती येऊ नये म्हणून यावर्षी शासनाने नियोजित प्रक्रिया सुरू केली आहे. पाठ्यपुस्तके वेळेवर न पोहोचवणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी सत्रासाठी जिल्ह्याला लवकर पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली. अन्य तालुक्यात लवकरच पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती आहे.