शाळा कर्मचाऱ्याला नागरिकांनी बदडले
By Admin | Updated: October 15, 2015 00:09 IST2015-10-15T00:09:42+5:302015-10-15T00:09:42+5:30
महिला व मुलींना बघून अश्लील अंगप्रदर्शन करणाऱ्या तखतमल प्राथमिक शाळेच्या कर्मचाऱ्याला साईनगरातील नागरिकांनी बेदम चोप दिला...

शाळा कर्मचाऱ्याला नागरिकांनी बदडले
अश्लील अंगप्रदर्शन : आरोपी ‘तखतमल’चा कर्मचारी
अमरावती : महिला व मुलींना बघून अश्लील अंगप्रदर्शन करणाऱ्या तखतमल प्राथमिक शाळेच्या कर्मचाऱ्याला साईनगरातील नागरिकांनी बेदम चोप दिला आणि राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी दुपारी घडली. मनीष अनिल जोशी (१९, रा. पार्वतीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
मनीष जोशी हा साईनगरातील तखतमल प्राथमिक स्कूलच्या वाहनावर वाहकपदी कार्यरत आहे. बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मनीष महाराष्ट्र बँक कॉलनी परिसरात उभा राहून तेथून ये-जा करणाऱ्या महिलांना पाहून अश्लील अंगप्रदर्शन करीत होता. त्याची हिंमत इतकी वाढली की, एका महिलेचा त्याने हातही पकडला. या घटनेनंतर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्याला तखतमल स्कूलमध्ये नेले. तो याच शाळेतील कर्मचारी असल्याची शहानिशा करून त्याला राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी प्रशांत जाधव, स्वप्निल भागवत, पंकज वानखडे, वैभव ठाकरे, तुषार देशमुख, हेमंत अवघड, नकुल कराळे, पंकज पडोळे, रोहित देशमुख, राहुल बागडे यांच्यासह अनेक महिलादेखील उपस्थित होत्या. महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुध्द कलम ३५४ (अ),५०९ अन्वये गुन्हा नोंदविला. याप्रकरणासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मनीषचे शाळेतून पलायन
मनीषला चोप देत तखलमल स्कूलच्या मुख्याध्यापकांकडे नेले असता शाळा व्यवस्थापन समितीने मनीषवर निलंबनाची कारवाई केली. त्यावेळी सर्व नागरिकांना शाळेच्या बाहेर थांबण्यास सांगण्यात आले होते. कारवाईची प्रक्रिया संपल्यावरही मनीष शाळेतून बाहेर निघाला नाही. त्यामुळे नागरिक पुन्हा शाळेत शिरले. मात्र मनीष पसार झाल्याचे लक्षात आले. मनीषचा पुन्हा शोध घेण्यात आला. काही युवकांनी मनीषला पुन्हा पकडून पोलिसात दिले.
प्रत्येक शाळेत पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समिती आहे. अशा प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येते. या प्रकरणातही चौकशी केली जाईल.
- श्रीराम पानझाडे,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
तो वाहक महिलांसमोर अश्लील कृत्य करताना आढळून आला. असे प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केल्याच्याही तक्रारी शाळेकडे आहेत. मात्र, शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने असे प्रकार होतात. शाळेवरही कारवाई व्हायलाच हवी.
- पंकज वानखडे,
नागरिक, साईनगर.
शाळेच्या वाहनावर कार्यरत वाहकाने महिलेची छेडखानी केल्याने नागरिकांना त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३५४(अ), ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
- एस.एस.भगत,
पोलीस निरीक्षक,
राजापेठ पोलीस ठाणे.