‘त्या’ शिक्षकाच्या हकालपट्टीचा शाळा समितीने के ला ठराव
By Admin | Updated: October 3, 2015 00:07 IST2015-10-03T00:07:31+5:302015-10-03T00:07:31+5:30
तालुक्यामधील नांदुरी येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकाची हकालपट्टी करावी, ...

‘त्या’ शिक्षकाच्या हकालपट्टीचा शाळा समितीने के ला ठराव
विद्यार्थ्यांना मारहाण : रुजू न करण्याच्या बीडीओच्या सूचना
धारणी : तालुक्यामधील नांदुरी येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकाची हकालपट्टी करावी, असा ठराव शाळा व्यवस्थापन समितीने घेतला तर त्या शिक्षकाला रुजू न करण्याच्या मौखिक सूचना बिडीओ यांनी मुख्याध्यापकाला दिल्या आहेत.
नांदुरी या गावातील जि. प. शाळेतील तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे बुधवारी पायाभूत चाचणी पेपर घेण्यात आले. वर्गशिक्षक निलेश पटोरकर यांनी उत्तरपत्रिका पाहिले असता विद्यार्थ्यांनी पेपर समाधानकारक लिहीले नसल्याचे लक्षात येताच त्यांचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना बेदम मारून झोडून काढले. पालकांनी प्रकरण पोलिसात दाखल केले व आरोपी शिक्षकाला अटक केली. शिक्षकाला काल न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मात्र या सर्व प्रकरणाने मेळघाटातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे काम केले आहे.
पालकांच्या तक्रारीवरून गटविकास अधिकारी रामचंद्र जोशी यांनी संबंधित शिक्षकाला शाळेत रुजू करु नका, असे मौखीक आदेश मुख्याध्यापक व्ही. के. करोची यांना दिले तर गुरुवारी दिवसभर पोलीस स्टेशन व कोर्टाची हवा खाल्याने शिक्षकाचेही मनोबल ढासळले. याच शिक्षकाला नांदुरी वासीयांनी यापूर्वी सुद्धा स्थानांतरणाची मागणी देण्याचा ठराव एक वर्षापूर्वी केला होता. परंतु माफीनाम्यानंतर त्याला सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र शिक्षकात काळीचाही फरक झाला नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. काल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शालिकराम दहीकर यांच्या उपस्थितीत शाळा समितीने पुन्हा नीलेश पटोरकर याची हकालपट्टीचा ठराव घेतला. शुक्रवारी शाळेत मुख्याध्यापक करोची यांच्या उपस्थितीत गांधी जयंती साजरी करण्यात आली. यात पोलीस पटेल, छगन खडके यांच्यासह गणमान्याची उपस्थिती होती. परंतु दरवर्षीचा उत्साह यात दिसला नाही. (तालुका प्रतिनिधी)