शाळेवर वीज कोसळली, पाच विद्यार्थी जखमी; इमारतीचे नुकसान
By Admin | Updated: September 19, 2015 00:00 IST2015-09-19T00:00:16+5:302015-09-19T00:00:16+5:30
ऐन शाळा सुटण्याच्या वेळेत मुसळधार पावसासह शाळा इमारतीवर वीज कोसळल्याने पाच आदिवासी विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना...

शाळेवर वीज कोसळली, पाच विद्यार्थी जखमी; इमारतीचे नुकसान
मेळघाटच्या राक्षा गावातील घटना
चिखलदरा : ऐन शाळा सुटण्याच्या वेळेत मुसळधार पावसासह शाळा इमारतीवर वीज कोसळल्याने पाच आदिवासी विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना तालुक्याच्या राक्षा या गावात मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजता घडली.
या घटनेत जखमी झालेल्या व भेदरलेल्या विद्यार्थ्यांवर हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन त्यांना सुटी देण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कन्हैय्या रामदास धांडे, जितेंद्र हिरालाल धांडेकर, अमोल सोनू शिंदे, राणी बिसराम दारसिंबे व सिंधू लक्ष्मण शनवारे सर्व (रा. राक्षा) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत. नेहमीप्रमाणे शाळा भरली असताना अचानक मूसळधार पावसाला सुरुवात झाली आणि वीज कोसळली. यात शाळा इमारतीचे सुध्दा नुकसान झाले, अशी माहिती पंचायत समितीतर्फे देण्यात आली. पंचायत समिती सभापती दयाराम काळे यांनी या घटनेची संपूर्ण माहिती संबंधितांकडून मागविली आहे.
दरम्यान या घटनेत काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची अफवा परिसरात पसरल्याने खळबळ उडाली होती. (तालुका प्रतिनिधी)
हरिसाल आरोग्य केंद्रात उपचार
शाळा इमारतीवर वीज कोसळताच इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत त्यावेळी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली. या घटनेमुळे मुख्याध्यापक पंकज कोदनकर यांनी अॅम्ब्युलन्स सेवेसाठी दूरध्वनी केला. मात्र, किमान तीन तास लागणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. अखेर गावकऱ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
राक्षा येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली. त्यामध्ये पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर हरिसाल आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. यात कोणतीच जीवितहानी झाली नाही, ती केवळ अफवा होती.
- आर. यू. सुरडकर, तहसीलदार, चिखलदरा.
राक्षा येथील शाळेवर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता वीज कोसळली. त्यात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत.
- मनोहर गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, पं.स. चिखलदरा