शाळेची इमारत मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2016 01:47 IST2016-12-28T01:47:05+5:302016-12-28T01:47:05+5:30
शाळेवर सिमेंटचे टीन आणि कौलारू छत आहे. पूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या बऱ्यापैकी होती.

शाळेची इमारत मोडकळीस
अमरावती : शाळेवर सिमेंटचे टीन आणि कौलारू छत आहे. पूर्वी या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या बऱ्यापैकी होती. मात्र, आता बोटावर मोजण्याइतकेच म्हणजे अवघे ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेची इमारत पूर्णत: मोडकळीस आली आहे. शाळेच्या आवारात शिक्षणमहर्षी भाऊसाहेब देशमुखांचा अर्धाकृती पुतळा आहे. डॉ.भाऊसाहेबांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या लोकोत्तर कार्याचे विद्यार्थी आणि शिक्षकांनाही सातत्याने स्मरण व्हावे आणि प्रेरणा मिळावी, या उद्देशाने बसविण्यात आलेलेल्या भाऊसाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचीच पुरती दुर्दशा झाली आहे.
या पुतळ्याच्या सभोवतालचे कठडे मोडकळीस आले आहेत. चारही बाजुंनी भिंतीला मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. पुतळ्याची रंगरंगोटी तर सोडाच साधी साफसफाई देखील अनेक वर्षांपासून केली नसल्याचे दिसून आले. पुतळ्यावर मातीचे थर साचले आहेत. कोणाचाही अंकुश नसल्याने या पुतळ्याच्या सभोवताल असामाजिक तत्त्वांचा वावर असावा, असे चित्र आढळले. दारूच्या रिकाम्या बाटल्या पुतळ्याशेजारीच पडून होत्या. कचरा अनेक दिवसांपासून पडून असल्याचे दिसून आले. दररोज रात्री भाऊसाहेबांच्या पुतळ्यामागे मद्यपार्टी रंगत असावी, अशी बिकट स्थिती दिसून आली. शाळा व्यवस्थापनाने तर सोडाच महापालिका प्रशासनानेही याकडे आजवर गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.
वर्षभराचे जाऊ दिले तरी मंगळवारी शिक्षणमहर्षी भाऊसाहेबांचा जयंत्युत्सव साजरा केला जात असताना निदान त्या दिवसापुरती तरी भाऊसाहेबांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी खरे तर मुख्याध्यापकांनीच पार पाडायला हवी होती. मात्र, याकामी कोणीही पुढाकार घेतला नाही. जयंतीदिनीही भाऊसाहेबांचा ‘तो’ पुतळा उपेक्षितच राहिला. लोकमतच्या चमूने या शाळेला आकस्मिक भेट दिली असता हा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला. महापालिका प्रशासन याप्रकरणी काय करते, याकडे लक्ष लागले आहे.