जिल्ह्यातील एक हजारांवर गावांमध्ये शाळेची घंटा वाजणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:37+5:302021-07-08T04:10:37+5:30
अमरावती : कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनामुक्त गावांतील ...

जिल्ह्यातील एक हजारांवर गावांमध्ये शाळेची घंटा वाजणार?
अमरावती : कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास टप्प्याटप्प्याने परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनामुक्त गावांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील १६८७ गावांपैकी १५३६ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे अशा गावातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग असलेल्या गावांमध्ये लवकर शाळेची घंटा वाजण्याची शक्यता आहे. शासनाचा हा निर्णयास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली, तर साधारणपणे एक हजारांवर गावांमधील शाळांची घंटा वाजू शकते. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहे. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक-मानसिक दुष्परिणाम होत आहेत, शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेता, यासाठी शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित क्षेत्रातील ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शाळेचे वर्ग सुरू करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा लागणार आहे. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावण्यात यावे, वर्ग अदलाबदलीच्या दिवशी सकाळी, दुपारी ठरावीक विषयासाठी प्राधान्य द्यावे तसेच सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. एका बेंचवर एकच विद्यार्थी, दोन बेंचमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर,कोणती लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवून लगेच काेरोना चाचणी करून घेणे, संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याबाबत दक्षता घ्यावी, शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन यासंदर्भात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
तालुकानिहाय कोरोनामुक्त गावांची संख्या
अमरावती १२९, भातकुली १२३, मोर्शी १०१, वरूड १०६, अंजगाव सुर्जी ८५, अचलपूर ९४, चांदूर रेल्वे ७९, चांदूर बाजार १२७, चिखलदरा १६५, धारणी १५३, दर्यापूर १०५,धामणगाव रेल्वे ८२, तिवसा ६६, नांदगाव खंडेश्वर १२१ याप्रमाणे कोरोनामुक्त गावांची संख्या आहे.
कोट
शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. मात्र, याकरिता संबंधित ग्रामपंचायतींचा ठराव, पालकांची समंती आवश्यक आहे. वर्ग सुरू करण्याबाबत वरिष्ठांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई केली जाईल.
- अनिल कोल्हे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)