तेरवीच्या खर्चातून देणार शिष्यवृत्ती
By Admin | Updated: October 24, 2016 00:26 IST2016-10-24T00:26:31+5:302016-10-24T00:26:31+5:30
अपघातात मरण पावलेल्या भगोले कुटुंबातील शिक्षक उमेश भगोले यांची तेरवी न करता त्यासाठी लागणाऱ्या रकमेच्या व्याजातून ...

तेरवीच्या खर्चातून देणार शिष्यवृत्ती
स्तुत्य उपक्रम : विद्यार्थ्यांना देणार बक्षिसे
चांदूररेल्वे : अपघातात मरण पावलेल्या भगोले कुटुंबातील शिक्षक उमेश भगोले यांची तेरवी न करता त्यासाठी लागणाऱ्या रकमेच्या व्याजातून शालांत परीक्षेत प्रथम क्रमांकाने गुण प्राप्त करणाऱ्या त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय भगोले कुटुंबाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल भगोले कुटुंबाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महिनाभरापूर्वी वकनाथ येथील जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक पदावर कार्यरत उमेश भगोले यांना शाळेतून धामणगावकडे परतत असताना समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ते जखमी झाले होते. त्यांच्यावर महिनाभरापासून नागपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर ते शुद्धिवर आलेच नाहीत. उपचार सुरू असतानाच १५ आॅक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. मात्र, भगोले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सामाजिक दायित्व पार पाडत पारंपरिक पद्धतीने त्यांची तेरवी न करता तेरवीच्या खर्चाच्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी याच शाळेतील शालांत परीक्षेत अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल भगोले कुटुंबाचे कौतुक होत आहे. (तालुका प्रतिनिधी)