दोन लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती संकटात ?
By Admin | Updated: January 28, 2016 00:13 IST2016-01-28T00:13:08+5:302016-01-28T00:13:08+5:30
इयत्ता अकरावी ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विविध प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या भारत सरकारच्या मॅट्रीकेतर शिष्यवृत्ती योजनेची ...

दोन लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती संकटात ?
मुदत संपुष्टात : दोन लाखांहून अधिक वंचित लाभार्थ्यांना मुदतवाढीची प्रतीक्षा
अमरावती : इयत्ता अकरावी ते पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विविध प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या भारत सरकारच्या मॅट्रीकेतर शिष्यवृत्ती योजनेची आॅनलाईन फार्म भरण्याची मुदत संपली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यात आलेले नाहीत. आतापर्यंत तब्बल चारवेळा मुदत वाढवूनही आॅनलाईन प्रणालीमधील अडचणींमुळे मुदतीत अर्ज भरणे महाविद्यालय व विद्यार्थ्यांना शक्य न झाल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीपासून सर्व जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.
सन २०१०-११ या शैक्षणिक वर्षापासून आॅनलाईन अर्ज भरावा लागत आहे. मागील शैक्षणिक वर्षात अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत होता. यंदाच्या २०१५-१६ शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठीचे अर्ज विद्यार्थ्यांनी भरावयाचे होते. तर पुढील वर्षासाठीचे अर्ज महाविद्यालयांनी अपडेट करावयाचे होते. यासाठी यंदा तब्बल चार वेळा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊनही विद्यार्थी व महाविद्यालयांना मुदतीत सर्व अर्ज भरता आलेले नाहीत. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १५ जानेवारी होती. यासाठी समाजकल्याण विभागाची साईट वारंवार हँग होणे अभ्यासक्रमाची फी न दाखविणे फी दाखविल्यास कमी अथवा जास्त दाखविणे, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम न दाखविणे अशा प्रकारचे विविध अडथळे येत होते. समाजकल्याण विभागाने ३१ आॅक्टोबर, ३० नोव्हेंबर व ३१ डिसेंबर व १५ जानेवारी अशी तब्बल चार वेळा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती. प्रणालीमधील अडथळे दूर करण्यात यश न आल्याने दोन लाखांवर विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)