योजना गरिबांची, लाभ मिळतो धनदांडग्यांना !
By Admin | Updated: September 18, 2015 00:21 IST2015-09-18T00:21:04+5:302015-09-18T00:21:04+5:30
शासन प्रशासन स्तरावर राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ हा गरिबांना नव्हे, तर धनदांडग्यांना मिळत आहे.

योजना गरिबांची, लाभ मिळतो धनदांडग्यांना !
अन्याय : गरजू लाभार्थी वंचितच, रिपाइंचा आरोप
अमरावती : शासन प्रशासन स्तरावर राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ हा गरिबांना नव्हे, तर धनदांडग्यांना मिळत आहे. या योजनांमध्ये सर्वेक्षण करुन खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात रिपाइंचे शहर उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती तसेच निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार, आर्थिक दुर्बल घटकांसाठीचा अनुदान योजनेत अनियमितता होत असल्याचा आरोप केला. निराधारासाठी ही योजना १९८० सालापासून राबविण्यात येत होती. परंतु अलीकडील काळात योजनेच्या निकषात पूर्णपणे बदल करून देवदासी, परितक्त्या, तृतीयपंथियांचा समावेश करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी व काही व्यक्तींनी केली आहे. मात्र याचा फायदा गरीबांना नव्हे तर धनदांडग्यांना होत आहे. योजनांचा वापर करून स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी याचा उपयोग होऊ लागल्याने खरेखुरे व गरजुवंत लाभार्थी मात्र वंचित राहू लागले असल्याचे रिपाइंचे म्हणणे आहे.
सध्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा योजना आहे तर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ, अपंग आणि विधवा निवृत्ती वेतन योजना आहे. ६५ वर्षावरील व्यक्ती, ८० टक्क्याहून जास्त अपंग, २१ हजाराच्या आतील उत्पन्न आणि मुलांचे वय वर्षाच्या आतील असल्यास यातील काही योजनांसाठी लाभार्थी पात्र होतो. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तलाठ्यांपासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवाय क्षेत्रीय मर्यादा न ठेवता प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना त्यांच्या इच्छेनुसार अधिकार देण्यात आले आहेत यात राजकीय दबाव वाढत आहे. (प्रतिनिधी)