यंदा एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा
By Admin | Updated: April 24, 2015 00:17 IST2015-04-24T00:17:50+5:302015-04-24T00:17:50+5:30
२०१३-१४ च्या हंगामातील सोयाबीन डागी व ५० टक्केही उगवणशक्ती नसणारे होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

यंदा एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा
गजानन मोहोड अमरावती
सलग दोन हंगामात सोयाबीन उद्धवस्त झाले. २०१३-१४ च्या हंगामातील सोयाबीन डागी व ५० टक्केही उगवणशक्ती नसणारे होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. २०१४-१५ च्या हंगामात पावसाअभावी सोयाबीन शेतातच विरले, उत्पादनात ६० ते ७० टक्क्यांनी घट झाली. यंदा साडेतीन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी होण्याची शक्यता आहे. यासाठी किमान २ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. महाबीज व इतर कंपन्यांकडून केवळ १ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असल्याने एक लाख क्विंटल बियाण्यांचा तुटवडा राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे राखून ठेवून बीजप्रक्रिया करावी, असा कृषी विभागाचा सल्ला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. मागील वर्षीचे सोयाबीन अतीपाऊस, परतीचा पाऊस यामध्ये गारद झाले. यंदाचे सोयाबीन पावसाअभावी दीड महिना उशिराने झालेली पेरणी व नंतर पावसातील खंड यामुळे बाधित झाले तसेच बाधित बियाण्यांच्या पेरणीमुळे यंदा सोयाबीनवर पिवळ्या ‘मोझॅक’ चा अटॅक झाला. या सर्वांचा परिणाम होऊन ७० टक्के सोयाबीन करपले. एकरी पोत्याचीही झडती झाली नाही. काही शेतामधील सोयाबीन शेतातच विरले मागील वर्षापेक्षा यंदाचे सोयाबीन अधिक खराब असल्याने ते पेरणीयोग्य नाही व उगवणशक्ती कमी असणारे आहे. त्यामुळे या बियाण्यावर पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करावी लागणार आहे. २ वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे ँॅत्र१ल्ल हंगामाकरिता सोयाबीन बियाण्यांची अवस्था बिकट आहे.
महाबीजचे प्लॉट देखील निकृष्ट आहे. अन्य बियाणे कंपन्यांची हीच स्थिती आहे. राज्यात सर्वाधिक सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांची अशीच व्यथा आहे. शेतकऱ्यांना आंतर पिकावर भर द्यावा लागणार आहे. या बिकट परिस्थितीमुळे यावर्षीचा सोयाबीनचा हंगाम शेतकऱ्यांना फारसा सुखावह राहणार नाही याची चिन्हे आतापासूनच दिसायला लागली आहे.