रासायनिक खताचा तुटवडा
By Admin | Updated: August 30, 2014 01:06 IST2014-08-30T01:06:47+5:302014-08-30T01:06:47+5:30
तालुक्यात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागला असताना कृषिसेवा केंद्राच्या संचालकांनी युरिया खताची दामदुप्पट भावाने विक्री केल्याने शेतकरी चिंतातूूर झाला आहे.

रासायनिक खताचा तुटवडा
दर्यापूर : तालुक्यात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासू लागला असताना कृषिसेवा केंद्राच्या संचालकांनी युरिया खताची दामदुप्पट भावाने विक्री केल्याने शेतकरी चिंतातूूर झाला आहे.
मागील महिन्यात तालुक्यात अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतीचे आर्थिक नुकसान झाले. नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या असून आर्थिक संकटातून शेतकरीवर्ग सावरला नसताना जे काही पिके वाचली आहेत त्या पिकांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. मात्र, पिकाला लागणारी रासायनिक खत शहरातील अनेक कृषिकंद्रांत तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, एकीकडे शेतकऱ्याला तुटवडा असल्याचे सांगायचे व दुसरीकडे २८५ रुपयांत मिळणारी रासायनिक खताची ५० किलोची बॅग ३५० रुपयांना विकायचे, असा प्रकार तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. रासायनिक खतांचा मोेठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असून याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे. या कृषीसेवा केंद्रात नेहमी तपासणी होत नसल्याने हा प्रकार वाढीस लागला आहे.
कृषी सेवा केंद्रात युरिया खताची खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांना ही बाब निदर्शनास आली. तालुक्यात ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक नुुकसान झाले असून नदीकाठची शेती खरडून गेल्याचा शासकीय अंदाज आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांची गोची झाली असून अशा गरीब शेतकऱ्यांना वाजवी दरात रासायनिक खतांची खरेदी करणे शक्य नाही. जिल्ह्याच्या ठिकाणाहून खतांचा पुरवठा शक्य नसल्याने तुटवडा भासत असल्याचे कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. काळाबाजार थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)