म्हणे कोरोना रोखू, रेल्वेचे प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST2021-03-09T04:16:11+5:302021-03-09T04:16:11+5:30

११ मार्चपासून अंमलबजावणी सुरू, भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांचे पत्र अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी ...

Says Corona Rokhu, train platform ticket Rs | म्हणे कोरोना रोखू, रेल्वेचे प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

म्हणे कोरोना रोखू, रेल्वेचे प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये

११ मार्चपासून अंमलबजावणी सुरू, भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांचे पत्र

अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी नातेवाईक, आप्तस्वकीयांची होणारी गर्दी रोखण्यासाठी आता प्लॅटफार्म तिकीटसाठी ५० रुपये मोजावे लागतील. रेल्वे बोर्डाच्या या नव्या आदेशाची अंमलबजवाणी ११ मार्चपासून आरंभली जाईल. भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रबंधकांचे ५ मार्च रोजी पत्र धडकले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना रेल्वे गाड्या निरतंरपणे सुरूच आहे. अशातच बाहेरगावाहून नातेवाईक, आप्तस्वकीयांचे आवागमन सुरूच आहे. कोरोना नियंत्रणासाठी गर्दीला आवर घालण्याचे निर्देश राज्य व केंद्र शासनाचे आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लॅटफार्म तिकीट महाग झाल्यास यापुढे प्रवाशांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी प्लॅटफार्मवर गर्दी होणार नाही, असा अंदाज रेल्वे विभागाने वर्तविला आहे. अगोदर प्लॅटफार्म तिकीटसाठी १० रुपये मोजावे लागत होते, आता मात्र गुरुवारपासून ५० रुपये मोजावे लागतील. प्लॅटफार्मशिवाय रेल्वे स्थानकावर प्रवेश केल्यास रेल्वे नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आरपीएफने स्पष्ट केले आहे. परंतु, कोरोना रोखण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये केल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. प्लॅटफार्म तिकीट महागडे करून कोरोना रोखता येणार नाही, तर प्रवेशद्धारावर नियमांचे पालन करण्यासाठी सक्ती असावी, असा सूर उमटत आहे. ५० रुपये प्लॅटफार्म तिकीट करून नागरिकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा प्रताप चालविल्याचे अमरावती महानगर यात्री महासंघाचे अध्यक्ष अनिल तरडेजा यांनी सांगितले.

-------------------

या रेल्वे स्थानकावर लागेल प्लॅटफार्म तिकीट

नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा.

----------------

प्लॅटफार्मचे तिकीट ५० रुपये होणे, हा निर्णय सामान्यांवर अन्यायकारक आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना पत्र दिले जाईल आणि प्लॅटफार्म तिकीट पूर्वीप्रमाणेच १० रुपये करावे, अशी मागणी केली जाईल.

- नवनीत राणा, खासदार, अमरावती

Web Title: Says Corona Rokhu, train platform ticket Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.