आहार पुरवठ्याच्या प्रतीक्षेत बचत गट
By Admin | Updated: May 18, 2014 23:15 IST2014-05-18T23:15:25+5:302014-05-18T23:15:25+5:30
एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता आणि कुपोषित बालकांना घरपोच आहार पुरविण्यासाठी महिला बचत गट

आहार पुरवठ्याच्या प्रतीक्षेत बचत गट
अमरावती : एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालके, गरोदर व स्तनदा माता आणि कुपोषित बालकांना घरपोच आहार पुरविण्यासाठी महिला बचत गट, महिला मंडळ व गावातील समुदायांकडून अर्ज मागवून निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये निवड झालेल्या बचत गटांनी युनिटची उभारणी केल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने आहार पुरवठ्याचे आदेश दिले नसल्याने अद्यापही बचत गट प्रतीक्षेतच आहेत. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने अंगणवाड्यांसाठी घरपोच आहार पुरवठा योजना राबविण्यात येते. ही योजना महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. परंतु जिल्ह्यातील महिला बचत गटांना पुरवठा करण्याचे आदेश अजूनपर्यंत अप्राप्त आहेत. यासाठी या महिला बचत गटांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून स्वतंत्र युनिट तयार केले आहे. केवळ दप्तर दिरंगाईमुळे हे आदेश प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे यासाठी जिल्हास्तरीय आहार समिती नेमण्यात आली आहे. समितीचे अध्यक्षपद जिल्हाधिकार्यांकडे असून अध्यक्ष व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी समितीचे सचिव आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ७ आॅक्टोबर २०१४ च्या निर्देशानुसार पोषण आहार पुरवठ्याचे काम महिला बचत गटांना देणे आवश्यक आहे. असे असतानासुद्धा जिल्ह्यातील बचत गटांना पोषण आहार पुरवठ्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. महिला बचत गटांनी पदरचे पैसे खर्च करून व कर्ज काढून स्वतंत्र युनिट तयार केले आहे. या युनिटची पाहणी अद्यापही या विभागाने केलेली नाही. (प्रतिनिधी)