पर्यावरण संवर्धनासाठी चिमण्यांना वाचवा

By Admin | Updated: March 20, 2017 00:09 IST2017-03-20T00:09:08+5:302017-03-20T00:09:08+5:30

मनुष्यवस्तीजवळ आढळणारी चिऊताई हल्ली संकटात सापडली आहे. तिचे संवर्धन होणे महत्त्वाचे आहे.

Save sparrows for environmental conservation | पर्यावरण संवर्धनासाठी चिमण्यांना वाचवा

पर्यावरण संवर्धनासाठी चिमण्यांना वाचवा

पक्षीप्रेमींचे आवाहन : जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य
इंदल चव्हाण अमरावती
मनुष्यवस्तीजवळ आढळणारी चिऊताई हल्ली संकटात सापडली आहे. तिचे संवर्धन होणे महत्त्वाचे आहे. २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा होत असून त्यानिमित्त चिमण्यांना वाचविण्याचा संकल्प आपण करायला हवी, असे आवाहन पक्षिमित्रांनी केले आहे.
सन २०१० पासून जागतिक स्तरावर २० मार्च चिमणी दिवस म्हणून साजरा होत आहे. आकाराने बुलबुल पक्षीपेक्षा लहान, माथा व खालचा अन् शेपटीचा भाग राखी, कानाजवळचा भाग पांढरा व कंठावर काळा पट्टा, मात्र मादी मळकट तपकिरी रंगाची अशी चिमणीची ओळख आहे. मात्र, हल्ली चिमण्यांचे दर्शन दुर्लभ होत आहे. क्वचितच ठिकाणी चिमण्यांची चिवचिवाट ऐकायला मिळते. शहरात बहुतांश ठिकाणांहून चिमण्या दिसेनासे झाल्यात. चिमण्या कमी होण्यामागे अनेक कारणे असली तरी त्याला मानवही जबाबदार आहे. भारतात एकूण ७ प्रकारच्या चिमण्या आढळतात. त्यातील सर्वात लाडकी चिमणी हाउस स्पॅरो होय. ही भारतात सर्वत्र आढळते. तिचे शास्त्रीय नाव पासेर डोमेस्टीकस असून पासेरिडी कुळातील हा पक्षी आहे. आकार १४ ते १६ सेमी असून वजन २६ ते ३२ ग्राम असते. १९ ते २५ सेमी पंखांचा विस्तार असतो. मात्र अलीकडे त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे, याला सिमेंटीकरण मोठे कारण आहे.

चिमण्या कमी होण्याची अनेक कारणे
चिमण्यांचा अधिवास नष्ट होणे हेच मुख्य कारण आहे. शहरात सिमेंटच्या घरांमुळे चिमण्यांना घरटी करायला जागा नाही. ग्रामीण भागात मातीची घरे व कवेलूंची असल्यामुळे चिमण्या राहू शकतात. मात्र आता शहरी संस्कृती खेड्यात पहायला मिळत आहे. चिमण्या एका वर्षात तीन ते चार वेळा अंडी देतात. मिलन काळात मातीत आंघोळ करतात. शहरात मातींच दिसेनाशी झाली आहे. चिमण्यांना घरटी करण्यासाठी गवत व इतर नैसर्गिक काडीकचरा लागतो. मात्र, शहरात गवत दिसतच नाही. पूर्वी चिमण्यांना शुद्ध अन्न व अळ्या भरपूर खायला मिळत होत्या. मात्र, आता सगळीकडे रसायने व औषधांचा वाढता वापर घातक ठरू लागला आहे. त्यातच शहरातील केबल वायर व मोबाईलच्या टॉवरमुळे त्यांचा प्रजनन क्षमतेवर फार मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे चिमण्यांची संख्या प्रमाणापेक्षा अधिक कमी झाली आहे.

वर्षभर चिमण्या आपल्या अंगणात येऊन चिवचिवाट करतील, यासाठी प्रयत्न करा. चिमणी साठी मातीची, लाकडाची घरटी व उन्हाळ्यात पाणी तर ठेवा. परसबागेत, विजेच्या मीटरवर, खिडकीत घरटे केल्यास ते काढून फेकू नका.
- यादव तरटे,
सदस्य, जैवविविधता व्यवस्थापन समिती, महानगरपालिका

Web Title: Save sparrows for environmental conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.