सातनूर शिवारात जुन्या वैमनस्यातून शेतमजुराची हत्या
By Admin | Updated: March 14, 2015 00:29 IST2015-03-14T00:29:13+5:302015-03-14T00:29:13+5:30
रवाळा शिवारात उमरी रस्त्यावर शेतात काम करीत असतांना अज्ञात आरोपीने काठीने व धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन एका शेतमजुराची हत्या केल्याची घटना ...

सातनूर शिवारात जुन्या वैमनस्यातून शेतमजुराची हत्या
शेंदूरजनाघाट : रवाळा शिवारात उमरी रस्त्यावर शेतात काम करीत असतांना अज्ञात आरोपीने काठीने व धारदार शस्त्राने डोक्यावर वार करुन एका शेतमजुराची हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री शेंदुरजनाघाट पोलीस ठाण्यांतर्गत घडली. आदिवासी शेतमजुराच्या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयावरुन एकाला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतकाचे नाव रामजी जोगी कुमरे (५५ रा. सातनूर) असे आहे. ते रवाळा शिवारातील शेतकरी सुधाकर भाजीखाये यांचेकडे कामावर होता. बैलजोडीवर रमेश फुसे यांचे शेतात १२ मार्चला काम करीत होता. सांयकाळच्या सुमारास शेतमालक फुसे यांना गंभीर जखमी अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेची शेंदूरजनाघाट पोलिसांना माहिती दिली. यावरुन पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृत रामजी जोगी कुमरे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान आणला. सदर घटना ही जुन्या वैमन्यास्यावरुन घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पाहून अज्ञात मारेकऱ्यांनी संधी साधून काठी तसेच धारदार शस्त्राचे डोक्यावर प्रहार करुन जागीच ठार केले. मृतकाच्या चेहऱ्यावर, डोक्यावर मोठया प्रमाणात जखमा आढळून आल्यात. मृताचा मुलगा शिवा रामजी कुमरे (रा. सातनूर) यांच्या तक्रारीवरुन शेंदूरजनाघाट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अमरावतीवरुन श्वान पथकालासुध्दा पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वानपथकाला आरोपीचा सुगावा लागला नाही. घटनेचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी राजा रामासामी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अशोक लांडे, दुय्यम ठाणेदार अनिल सिरसाठसह शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहे.