तीन तालुक्यांतील दीड लाख महिलांच्या नावे होणार सातबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 23:56 IST2016-07-31T23:56:51+5:302016-07-31T23:56:51+5:30

महसुली कामे त्वरित निकाली निघून सर्वसामान्यांना न्याय मिळावा,...

Satbara will be given to 1.5 lakh women in three talukas | तीन तालुक्यांतील दीड लाख महिलांच्या नावे होणार सातबारा

तीन तालुक्यांतील दीड लाख महिलांच्या नावे होणार सातबारा

महसूलदिन : आठवडाभर महिलांसाठी अभियान 
मोहन राऊत  धामणगाव रेल्वे
महसुली कामे त्वरित निकाली निघून सर्वसामान्यांना न्याय मिळावा, यासाठी सुरू केलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत यंदा तीन तालुक्यांतील दीड लाख महिला शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा होणार असून उद्या महसूल दिनानिमित्त या उपक्रमाची सुरूवात होणार आहे़
राज्य शासनाच्यावतीने दरवर्षी १ आॅगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जातो. सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत मागील वर्षीपासून राज्यात महाराजस्व अभियान राबवून पांदण रस्ते मोकळे करणे, शासकीय जागेवरील अतिक्रमण काढणे, जातीच्या प्रमाणपत्रांसह विविध दाखल वितरित करणे, असे उपक्रम महसूल विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहेत.
महिलांसाठी महसूल आठवडा
शासनाने यापूर्वी महिलांच्या नावे सातबारा करण्याचे धोरण स्वीकारले आहे़ यंदा १ ते ८ आॅगस्टपर्यंत महिला शेतकऱ्यांना शेतीविषयक अधिकार मिळावेत म्हणून सात दिवस विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तीनही तालुक्यांतील महिला शेतकऱ्यांच्या नावे सातबारा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे़

२० गावांत राबविणार शिबिर
चांदूर उपविभागातील पळसखेड, सातेफळ, घुईखेड, राजुरा, चांदूररेल्वे, आमला विश्वेश्वर, तळेगाव दशासर, मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी, चिंचोली, भातकुली, दत्तापूर, नांदगाव खंडेश्वर, पापळ, लोणी, दाभा, माहुली चोर, धानोरा गुरव अशा २० गावांत विशेष शिबिर राबविण्यात येणार आहे़ तर ६ आॅगस्ट रोजी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ़वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथे महाराजस्व अभियानात महिला शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यात येणार आहे़

यंदा महाराजस्व अभियानात महिला शेतकऱ्यांसाठी महसूल आठवडा राबविण्यात येणार आहे. शेतकरी महिलांच्या नावे सातबारा करण्यासोबतच इतरही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याचा लाभ महिला शेतकऱ्यांनी घ्यावा़
- जनार्दन विधाते, एसडीओ, चांदूररेल्वे

Web Title: Satbara will be given to 1.5 lakh women in three talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.