२१ वर्षांची अक्षता कापूसतळणीची सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:16 IST2021-02-27T04:16:23+5:302021-02-27T04:16:23+5:30

अमरावती येथे मामांकडे शिक्षणानिमित्त वास्तव्याला असताना रोज येणाऱ्या घंटागाड्या, नियमित नाल्यांची होणारी साफसफाई, कोरोनाकाळात शहरभर होणारी फवारणी या सोयी ...

Sarpanch of 21-year-old Akshata Kapusatlani | २१ वर्षांची अक्षता कापूसतळणीची सरपंच

२१ वर्षांची अक्षता कापूसतळणीची सरपंच

अमरावती येथे मामांकडे शिक्षणानिमित्त वास्तव्याला असताना रोज येणाऱ्या घंटागाड्या, नियमित नाल्यांची होणारी साफसफाई, कोरोनाकाळात शहरभर होणारी फवारणी या सोयी माझ्या गावात का नाहीत, असा प्रश्न कायम मनात घोंघावणाऱ्या तरुणीला वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी कापूसतळणी या गावाच्या सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळाला. अक्षता किशोर खडसे असे तिचे नाव.

कापूसतळणी हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव. सुमारे २० हजार लोकवस्तीच्या या गावात १७ सदस्यांची ग्रामसंचायत आहे. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) ची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असलेली अक्षता कापूसतळणीच्या इतिहासात सर्वाधिक कमी वयाची सरपंच ठरली आहे.

प्रेरणा काय?

पहिली ते दहावी गावातील निर्मला हायस्कूलमध्ये, त्यानंतर अमरावतीच्या विद्याभारती नि पुढे शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात शिक्षण सुरू असल्याने अमरावतीत मामांकडे वास्तव्य होते. शहरातील रस्ते चांगले, साफसफाई उत्तम, कोरोनाकाळात फवारणी-धूरळणीही, मग आपल्या कापूसतळणीत नालीही का साफ केली जाऊ नये, या विचारांतून ग्रामपंचायत निवडणूक लढण्याची प्रेरणा मिळाली. वडील किशोर खडसे यांना लोकांची मदत करण्याचा छंद असल्याचे अक्षता सांगते. त्यामुळे बाप-लेकी दोघांनीही निवडणूक लढण्याचे ठरले. दोघेही निवडून आले. नऊ-दहा महिला सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत ओबीसी राखीव पदावर अक्षता ही भारती पाथरे यांना हरवून सरपंचपदी निवडून आली. २४ फेब्रुवारी रोजी तिने पदभार स्वीकारला. लागलीच गावातील नाल्या स्वच्छ करण्यास कंत्राट तिने देऊ केले. ग्रामपंचायत सदस्यांनी आपआपल्या वॉर्डात जातीने हजर राहून उत्तमरीत्या नाली सफाई करून घेण्याची सूचनाही तिने सहकारी सदस्यांना दिली.

छोट्या-छोट्या अनेक गोष्टी तिला गावासाठी करायच्या आहेत. बुद्धिमान असलेल्या गावातील तरुणांना आर्थिक अक्षमतेमुळे आई-वडील शिकवू शकत नाहीत. त्यांच्यासाठी तिला गावात विनामूल्य लायब्ररी उभारायची आहे. नीट, जेईई, एनसीईआरटी अशी आणि स्पर्धा परीक्षांचीही पुस्तके तिला मोफत वाचनासाठी उपलब्ध करून द्यावयाची आहे.

महिलांसाठी पापड, कुरवड्या, वड्या, शिवणकाम यांसारखी उत्पन्नाची साधने उपलब्ध करवून द्यायची आहेत. बचतगट हा अक्षताला त्यासाठी पर्याय वाटतो. महिला सक्षम होण्याच्या दिशेने हे छोटे पाऊल असेल, असे ती म्हणते.

ज्ञानाचा उपयोग करणार

मी शिकले आहे. गावात आर्थिक स्रोत वाढवायचे आहेत. माझ्या ज्ञानाचा उपयोग करून आमदार, खासदार, मंत्री यांच्या माध्यमातून गावासाठी निधी आणण्याची योजना आहे. गाव मोठे आहे, पण योग्य रस्तेही नाहीत. उत्पन्नाचे विविध स्रोत वाढवून आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध करून द्यायच्या आहेत.

ऑनलाईन क्लासेस, स्पर्धा परीक्षाही

अमरावतीत आता लॉकडाऊन आहे. क्लासेस ऑनलाईन आहेत. सरपंचपदाची जबाबदारी शिरावर असताना, या स्थितीचा उपयोग अक्षता करून घेत आहे. सकाळी आईला कामात मदत करून १० वाजता ती ग्रामपंचायतीत पोहोचते. २ पर्यंत कामे निपटवून तासभराचा एमएस्सीसाठीचा आॅनलाईन क्लास तिच्या कार्यालयातूनच अटेंड करते. सायंकाळी ५ पर्यंत कार्यालयात असते. नंतर घरीही गावातील लोकांना अटेंड करते. दिनचर्या व्यस्त असली तरी त्याचा ती आनंद घेते आहे. वेळ मर्यादित असल्याने हल्ली तलाठी, ग्रामसेवक पदाच्या परीक्षेचीही ती तयारी करते आहे. ती परीक्षा पास झाली, की अधिकारीपदाची परीक्षा ती देणार आहे. पण, पहिली पाच वर्षे नोकरी मिळाली तरी सरपंचपद निष्ठेने निभावेल, असा तिचा निर्धार आहे.

पप्पा रोल मॉडेल

माझे पप्पा किशोर खडसे हेच माझे रोल मॉडेल आहेत. आम्हाला भाऊ नाही. दोघी बहिणीच. त्यामुळे मीच वडिलांचा मुलगाही आहे. मला जबाबदारीही पार पाडायची आहे. लोकांसाठी काम करणारे पप्पा लहानपणापासून पाहिले आहेत. त्याच आदर्शावर मी चालते आहे. गावातील लोकांनी मला सरपंचपदायोग्य समजले, हा माझ्यावर गावकऱ्यांचा विश्वासच. मी त्याला खरे उतरेन, असा निर्धार अक्षताचा आहे. गृहिणी असलेल्या माझ्या आईला माझ्या या यशाचा गर्व वाटतो, अशा हळव्या भावनाही तिने व्यक्त केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य तिला प्रेरणा देतात.

सर्व मला ‘मॅडम’ म्हणतात

पदभार स्वीकारण्याचा अनुभव विचारल्यावर ती म्हणाली, १७ सदस्य आहेत. त्यात वडीलही आहेत. वयाने सर्वच मोठे. मी बरीच लहान. पण, सर्व जण मला ‘मॅडम’ म्हणतात. असा सन्मान कुणालाही आवडेलच ना?

- लेखक हे अमरावती कार्यालयात संपादकीय प्रमुख आहेत.

ganesh.deshmukh@lokmat.com

Web Title: Sarpanch of 21-year-old Akshata Kapusatlani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.