संजय नरवणे नवे महापौर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 00:02 IST2017-03-06T00:02:09+5:302017-03-06T00:02:09+5:30

महापालिकेत ४५ सदस्यीय ‘टीम भाजप’चा चेहरा म्हणून संजय सातप्पा नरवणे यांची निवड करण्यात आली आहे.

Sanjay Narve new mayor! | संजय नरवणे नवे महापौर!

संजय नरवणे नवे महापौर!

भाजपक्षाचा निर्णय : संध्या टिकलेंकडे उपमहापौरपद, ९ मार्चला औपचारिक निवड
अमरावती : महापालिकेत ४५ सदस्यीय ‘टीम भाजप’चा चेहरा म्हणून संजय सातप्पा नरवणे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीने नरवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून ते महापालिकेचे १५ वे महापौर ठरतील. नरवणे यांची महापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली असली तरी ९ मार्चला महापालिका सभागृहात होणाऱ्या विशेष सभेत त्यांची अधिकृतरीत्या निवड होईल.
८७ सदस्यीय सभागृहात भाजपकडे सर्वाधिक ४५, काँग्रेसकडे १५, एमआयएमचे १०, बसपाचे ५, शिवसेनेचे ७, स्वाभिमानचे ३ व २ अपक्ष सदस्य आहेत. भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने सत्तेची सर्व पदे त्यांच्याकडे जाण्याची औपचारिकता पाहता महापौरपदी कुणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. रविवारी सकाळी ११.३० ते ५.३० या कालावधीत महापौर - उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल करावयाचे असल्याने भाजप अंतर्गत गोटात बैठकांना जोर आला होता. शनिवारी उशिरापर्यंत भाजपची विश्रामगृहात मॅरेथॉन बैठक चालली. नवनियुक्त ४५ सदस्यांशी सल्ला मसलत करून महापौर, उपमहापौर, सभागृह नेता व स्थायी समिती सभापतीपदी कोण, यावर मंथन करण्यात आले. महापौरपद एससीसाठी राखीव असल्याने १० पैकी कोण, असा प्रश्न भाजपमध्ये उपस्थित झाला होता. चर्चेची गुऱ्हाळे रंगल्यानंतर कोअर कमिटीने रविवारी महापौरांसह अन्य नावे निश्चित केली. भाजपचे आ. चैनसुख संचेती, आ. सुनील देशमुख, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, शहराध्यक्ष जयंत डेहनकर आदींनी रविवारी सकाळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. त्यानुसार प्रभाग क्र. ६ अ. विलासनगर-मोरबाग येथून निवडून आलेले संजय नरवणे हे आता अमरावतीचे प्रथम नागरिक अर्थात महापौर असतील. काँगे्रसच्या शोभा शिंदे यांनी महापौरपदासाठी नामांकन दाखल केल्याने ९ मार्चकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजप, काँग्रेस, एमआयएमकडून नामांक न दाखल
अमरावती : रविवारी सकाळी ११.३० ते ५,३० या कालावधीत महापौर आणि उपमहापौरपदासाठी नामांकन स्वीकारले गेले. महापौरपदासाठी भाजपकडून संजय नरवणे यांनी दोन अर्ज दाखल केलेत. काँग्रेसच्या शोभा शिंदे यांनी महापौरपदासाठी नामांकन दाखल केले. याशिवाय उपमहापौरपदासाठी भाजपच्या संध्या टिकले यांनी दोन नामांकन दाखल केलेत. काँग्रेसकडून अब्दुल वसीम मजीद आणि एमआयएमकडून अफजल हुसेन मुबारक हुसेन यांनी अर्ज दाखल केला. महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरताना भाजपने शक्तीप्रदर्शन केले. भाजपचे सर्वच स्थानिक नेते आणि नवनियुक्त नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

पडद्यामागे हालचाली
महापौरपदासाठी भाजपमध्ये संजय नरवणे आणि राधा कुरील यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली. राधा कुरील आक्रमक आणि अनुभवी असल्याचे आग्रहपूर्वक सांगण्यात आले. महापौरपदाचा तराजू अनेकदा त्यांच्याकडे झुकला. मात्र सरतेशेवटी संजय नरवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. अजय गोंडाणे, विजय वानखडे यांचीही नावे स्पर्धेत होती.

काळेंचे सभागृहनेतेपद आश्चर्यकारक
राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपात डेरेदाखल झालेल्या सुनील काळे यांची सभागृह नेतेपदी झालेली निवड आश्चर्यकारक ठरली आहे. सभागृह नेतेपदासाठी चर्चेत असलेल्या विवेक कलोती यांच्याकडे भाजपने उपगटनेतेपद दिले आहे. काळे हे सूतगिरणी तर कलोती जवाहरगेट बुधवारा प्रभागातून निवडून आले आहे.

उपमहापौर महिलेकडे
ज्येष्ठ नगरसेविका संध्या टिकले यांच्यावर उपमहापौरपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली . मेघा हरणे यांच्यानंतर त्या दुसऱ्या महिला उपमहापौर असतील. पाच वर्षांनंतर टिकले या भाजपच्या उमेदवारीवर बेनोडा - भीमटेकडी - दस्तुरनगर प्रभाग क्र. १० क मधून निवडून आल्या आहेत. त्या भाजपच्या कट्टर अनुयायी आहेत.

स्टँडिंग भारतीयांकडे
अपेक्षेप्रमाणे तुषार भारतीय स्थायी समितीचे नवे सभापती असतील. मावळत्या पंचवार्षिकमध्येसुद्धा ते स्थायी समितीचे सदस्य होते. प्रभाग क्र. १९ ड साईनगरमधून भारतीय सर्वाधिक मताने विजयी होवून दुसऱ्यांदा सभागृहात पोहोचलेत. याशिवाय भारतीय हे माजी शहर जिल्हाध्यक्ष असून त्यांनी बडनेरा विधानसभाही लढविली आहे.

पार्लमेंट्री बोर्डच्या बैठकीत संभाव्य नावांवर चर्चा करण्यात आली. सर्वांची मते जाणून घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करण्यात आली.
- जयंत डेहणकर,
शहराध्यक्ष, भाजप

Web Title: Sanjay Narve new mayor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.