पळसाखाली झाकला वाळू साठा
By Admin | Updated: June 27, 2016 00:08 IST2016-06-27T00:08:52+5:302016-06-27T00:08:52+5:30
जंगलात वाळूचा साठा करून ती वाळू लपविण्याच्या उद्देशाने पळसाची पाने टाकून झाकून ठेवण्यात आली.

पळसाखाली झाकला वाळू साठा
वाळू माफियांचा प्रताप : तीन लाखांची वाळू जप्त
अमरावती : जंगलात वाळूचा साठा करून ती वाळू लपविण्याच्या उद्देशाने पळसाची पाने टाकून झाकून ठेवण्यात आली. वाळूमाफियाचा हा प्रताप रविवारी उघडकीस आला. हा वाळू साठा मंडळ अधिकाऱ्यांनी जप्त केला असून पुढील कायदेशीर कारवाई महसूल विभाग करीत आहेत.
अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी सुरु असल्याचा भांडाफोड झाला. महसूल विभागाने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसुध्दा केली. मात्र, आणखी अनेक वाळू साठे असल्याचे निदर्शनास आले होते. त्याकरिता पोलीस अधीक्षक लखमी गौतम पोलिसांचे एक स्वतंत्र पथक तयार करून कारवाईची आदेश दिलेत. त्यानुसार वाळू माफियानी साठविलेल्या वाळुची शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली. धारणी ठाण्याच्या हद्दीतील भोकरबर्डी येथील शिवारात महाराष्ट्र- मध्यप्रदेश सिमेवर तापी नदी आहे. या नदीच्या काठावर तसेच आजूबाजूच्या जंगलामध्ये अवैधरीत्या वाळूचा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक एम.एम. मकानदार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नागेश चतरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण मेटे, पोलीस शिपाई सचीन मीश्रा, गजेंद्र ठाकरे, शैलेश तिवारी व चालक काळे यांनी वाळु साठ्याचा शोध घेतला. त्यामध्ये नदीपासून काही अंतरावर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस व जंगलात अशा तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू लपून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
हा वाळू साठा कोणाला दिसू नये, याकरिता वाळू माफियांनी तो साठा पळसाच्या पानांखाली झाकून ठेवल्याचे लक्षात आले. या वाळू साठ्याची शहानिशा करण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत घटनास्थळी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पाचारण केले. त्यांनी वाळूची पाहणी केली असता ती वाळू अवैध असून वाळू अंदाजे ९४ ब्रॉस व २ ते ३ लाख किमतीची असल्याचे निदर्शनास आले. ती वाळू मंडळ अधिकाऱ्यांनी जप्त केली. (प्रतिनिधी)