‘सामरा’ची प्राची, ‘संगई’ची अनुजा अव्वल

By Admin | Updated: June 6, 2016 23:58 IST2016-06-06T23:58:36+5:302016-06-06T23:58:36+5:30

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजात आॅनलाईन पध्दतीने जाहीर झाला.

'Samra' prachi, 'Sangai' Anuj tops | ‘सामरा’ची प्राची, ‘संगई’ची अनुजा अव्वल

‘सामरा’ची प्राची, ‘संगई’ची अनुजा अव्वल

जिल्ह्याचा निकाल ८४.०८ टक्के : सीताबाई संगईची गुंजन ढोले द्वितीय
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजात आॅनलाईन पध्दतीने जाहीर झाला. शहरातील ब्रिजलाल बियाणी शिक्षण संस्थेद्वारे संचालित भंवरीलाल सामरा इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी प्राची सुनील उदासी व अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई कन्या शाळेची विद्यार्थिनी अनुजा रवींद्र माकोडे या दोघींनी ९८.६० टक्क्यांसह संयुक्तपणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
तर सीताबाई संगई कन्या विद्यालयाचीच विद्यार्थिनी गुंजन सदानंद ढोले हिने ९८.४० टक्के गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर होलिक्रॉस इंग्लिश कॉन्व्हेंटची अपूर्वा शरद उमक, ज्ञानमाता हायस्कूलचे विद्यार्थी रोहित भोजराज राठी, आदित्य अजय कडुकार व नारायणदास लढ्ढा हायस्कूलची विद्यार्थिनी साक्षी इंगोले यांनी ९८.२० टक्के गुणांसह संयुक्तपणे जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला.
जिल्ह्याच्या दहावीच्या निकालावर यंदादेखील मुलींचाच वरचष्मा आहे. भंवरीलाल सामरा इंग्लिश हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. भंवरीलाल सामरा हायस्कूलने सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेतून यंदा १३२ परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३० विद्यार्थी ९० टक्केपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेत.
जिल्ह्याला टॉपर देणाऱ्या अंजगाव सुर्जी तालुक्यातील सीताबाई संगई कन्या शाळेचा निकाल ९८.७५ टक्के लागला आहे. या शाळेतून ५२ विद्यार्थिनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन तर १११ विद्यार्थिनी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधून यंदा चिखलदरा तालुक्याचा निकाल सर्वाधिक ८६.८६ टक्के लागला आहे तर तिवसा तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७२.८९ टक्के लागला आहे.

३६ शाळांचा १०० टक्के निकाल
जिल्ह्यातील ३६ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. त्यात एसपी विद्यालय, नया अकोला, होलिक्रॉस कॉन्व्हेंट, सरस्वती गोसावी विद्यामंदिर, नांदगाव, भंवरीलाल सामरा हायस्कूल, अमरावती, सेंट जॉर्जस इंग्लिश हायस्कूल, श्री ज्ञानदेव विद्यालय, पिंपळखुटा, अरूणोदय इंग्लिश स्कूल, युनिक इंग्लिश प्री-स्कूल, हंटबेटिंग स्कूल, अमरावती, तखतमल इंग्लिश हायस्कूल अमरावती, ए.डी.कॉन्व्हेंट स्कूल, वलगाव, जिंगलबेल इंग्लिश स्कूल, चांदूररेल्वे, नगर परिषद उर्दू माध्यमिक स्कूल, धामणगाव रेल्वे, सनराईज इंग्लिश स्कूल, तिवसा, लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल तिवसा, ज्ञानदीप विद्यालय, ब्राह्मणवाडा, श्री विवेकानंद कन्या विद्यालय, नेरपिंगळाई, श्रावणजी फरकाडे कन्या विद्यालय, बेनोडा, शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल, वरूड, शामकांत बोबडे विद्यालय विरूळपूर्णा, गुरूकुल पब्लिक स्कूल, परतवाडा, भाग्यश्री विद्यालय असदपूर, फातिमा इंग्लिश कॉन्व्हेंट, अचलपूर, सीताराम गणोरकर इंग्लिश स्कूल अचलपूर, अ‍ॅव्हेंट पब्लिक स्कूल, गर्व्हमेंट गर्ल्स निवासी शाळा, बुरडघाट, बाबासाहेब वऱ्हाडे उर्दू शाळा, कसबेगव्हाण, प्रागतिक विद्यालय, वरूड बु, साहेबराव कोकाटे स्कूल नायगाव, गर्व्हमेंट एससी नवबौध्द बॉईज निवासी शाळा, दीपशिखा गुरूकुल सैनिकी शाळा, चिखलदरा, कस्तुरबा गांधी विद्यालय, धारणी, डब्ल्यू.पी. वर्धे इंग्लिश स्कूल, धारणी, किड्स केअर स्कूल, धारणी या शाळांचा समावेश आहे.

जुलै महिन्यात पुनर्परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा सोमवारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वीचा) निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालामध्ये काही विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली असली तरी जुलै महिन्यात पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे. नियमित विद्यार्थ्यांसोबतच पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार असल्याने वर्ष वाया जाणार नाही, अशी सोय शिक्षण मंडळाने केली आहे. शिक्षण मंडळाच्या नवीन धोरणानुसार इयत्ता १० व १२ वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये, यासाठी वेळेतच पुनर्परीक्षा घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार १५ जून रोजी विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका शाळामार्फत वितरित करण्यात येणार आहे. गुणपडताळणीची अंतिम तारीख १६ जून निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थी ७ ते २७ जून या कालावधीत उत्तरपत्रिकेची छायाचित्र प्रतीसाठी अर्ज करु शकतील, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. पुनर्परीक्षेसाठी जुलै महिन्यात तारखा निश्चित केल्या नसल्या तरी त्या स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील, असे अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी कळविले आहे.

विभागात जिल्हा चौथा
अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ८८.९१ टक्के लागला. अकोला ८१.३४, यवतमाळ ८२.६६ तर वाशिम जिल्ह्याचा निकाल ८८.७२ टक्के लागला. अमरावती जिल्ह्यातील ४४१५० विद्यार्थ्यांपैकी ३७१२२ अर्थात ८४.०८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

८९२८ प्रावीण्य श्रेणीत
जिल्ह्यातील ४४३०७ विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेसाठी आवेदन केले होते. त्यापैकी ४४१५० विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. त्यापैकी ३७१२२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. पैकी ८९२८ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांवर म्हणजेच प्रावीण्य श्रेणी मिळाली. १४५०३ विद्यार्थी प्रथम, तर ११५२० द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

५१३४ पुनर्परीक्षार्थी उत्तीर्ण
अमरावती जिल्ह्यातून ३२९१ विद्यार्थ्यांनी दहावीची पुनर्परीक्षा दिली. यात १५३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ४६.६१ टक्के आहे. यातील १० विद्यार्थ्यांना प्राविण्यश्रेणी, ४१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ८७ विद्यार्थी श्रेणीत उत्तीर्ण झालेत.

मराठी माघारली
इंग्रजीच्या तुलनेत मातृभाषा मराठीचा टक्का घसरला आहे. मराठी विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९०.५२ एवढी आहे तर इंग्रजीमध्ये ८९.८१ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ संस्कृत विषयाचा निकाल ९८.८९ टक्के लागला आहे.

चार तालुके ८६ प्लस
चिखलदरा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ८६.८६ टक्के गुण मिळवून चिखलदरा तालुक्याने अन्य तालुक्यांना मागे टाकले आहे. चिखलदरा, धारणी, अमरावती आणि दर्यापूर तालुक्याचा निकाल ८६ टक्क्यांच्या वर लागला आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत तिवसा तालुका शेवटच्या क्रमांकावर आहे. या तालुक्याचा निकाल केवळ ७२.८९ टक्के लागला आहे.

चार विषयांचा १०० टक्के निकाल
मार्च २०१६ मध्ये झालेली दहावीची परीक्षा २४ विषयांमध्ये घेण्यात आली. यात गुजराती, फिजिओलॉजी, हायजीन अँड होम सायन्स, अ‍ॅरिथमेटिक (हँडीकॅप) आणि इंट्रोडकश्न आॅफ बेसिक टेक्नॉलॉजी या विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

Web Title: 'Samra' prachi, 'Sangai' Anuj tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.