रस्ता निर्मिती साहित्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले
By Admin | Updated: January 1, 2015 22:54 IST2015-01-01T22:54:39+5:302015-01-01T22:54:39+5:30
शासनाच्या सुवर्णजंयती नगरोत्थान योजनेतून येथील नारायणनगर ते अम्मन बोअरवेलपर्यंतच्या रस्त्याचे निकृष्ट बांधकाम होत असल्याच्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी या रस्ता निर्मितीत

रस्ता निर्मिती साहित्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले
अमरावती : शासनाच्या सुवर्णजंयती नगरोत्थान योजनेतून येथील नारायणनगर ते अम्मन बोअरवेलपर्यंतच्या रस्त्याचे निकृष्ट बांधकाम होत असल्याच्या तक्रारीच्या आधारे गुरुवारी या रस्ता निर्मितीत वापरल्या जात असलेल्या साहित्याचा दर्जा तपासणीसाठी शासकीय अभियायांत्रिकी महाविद्यालयात नमुने पाठविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर महापालिका अभियंत्यांच्या चमुने घटनास्थळी पाहणी करुन वस्तुस्थिती जाणून घेतली.
आदर्श नगरात निर्माण होणाऱ्या या रस्त्याचे काम रुपचंद खंडेलवाल नामक कंत्राटदाराने घेतले आहे. एक कि.मी. चा हा रस्ता दोन कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चातून होत असताना साहित्य आणि बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी वारंवार केल्यात. मात्र सदर कंत्राटदार कोणालाही जुमानत नसल्यामुळे आपल्या मर्जीनुसार या रस्त्याची सुरु असल्याचे चित्र आहे. परिणामी परिसरातील नागरिकांनी संतापून बुधवारी महापालिकेच्या अभियंत्याला ओलीस ठेवले. कालांतराने आ. सुनील देशमुख आदर्शनगरात पोहचले. रस्ता निर्मितीत वापरल्या जात असलेले साहित्य तपासले असता हे साहित्य सुमार असल्याचे आ. देशमुखांचा लक्षात आले. त्यानंतर सुनील देशमुखांनी कंत्राटदार खंडेलवाल, अभियंता आनंद जोशी यांची चांगलीच कानउघाडणी केली. कंत्राटदारांच्या अरेरावीला लगाम लावण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे आ. सुनील देशमुख यांनी नागरिकांना सांगितले. रस्ता निर्मितीत ढिसाळ मुरुम, माती व स्ट्रोन क्रेशरमधील चुरा वापरत असल्याच्या गाऱ्हाणी नागरिकांनी आ. देशमुखांचा पुढ्यात मांडल्यात. दरम्यान नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. आ. सुनील देशमुखांच्या समक्ष हे साहित्य जमा केले. बुधवारी झालेला प्रकार गंभीर असल्याची दखल घेते गुरुवारी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सिव्हील विभाग प्रमुख दिलीप चौधरी, उपअभियंता प्रमोद इंगोले, अभियंता आनंद जोशी, बहाळे आदिंनी आदर्शनगरात जाऊन घटनास्थळी भेट दिली. रस्ता निर्मितीत वापरल्या जात असलेल्या साहित्याचा दर्जा तपासला असता हे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे या चमुच्या निदर्शनास आले. त्यानंतर या साहित्याचे नमुने येथील शासीकय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले. दोन दिवसात अहवाल प्राप्त होताच सदर कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असे संकेत शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांनी दिले आहे.