...तर दीक्षांत सोहळा उधळून लावू; संभाजी ब्रिगेड, एआयएसएफचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 21:00 IST2021-02-10T20:59:54+5:302021-02-10T21:00:40+5:30

कुलसचिव तुषार देशमुख यांना संभाजी ब्रिगेड व एआयएसएफचे पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. कुलसचिवांना निवेदन, संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनीच अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा घेण्याची मागणी.

Sambhaji Brigade, AISF gave warning Amravati university | ...तर दीक्षांत सोहळा उधळून लावू; संभाजी ब्रिगेड, एआयएसएफचा इशारा

...तर दीक्षांत सोहळा उधळून लावू; संभाजी ब्रिगेड, एआयएसएफचा इशारा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा २१ नव्हे, तर २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी घेण्यात याव्या, अन्यथा दीक्षांत सोहळा उधळून लावू, असा निर्वाणीचा इशारा संभाजी ब्रिगेड, ऑल इंडिया स्टुडन्ट्‌स फेडरेशनच्यावतीने बुधवारी देण्यात आला. यासंदर्भात कुलसचिव तुषार देशमुख यांना निवेदन सादर करण्यात आले.

संत गाडगेबाबांची जयंती २३ फेब्रुवारी रोजी असताना अमरावती विद्यापीठाने २१ फेब्रुवारी रोजी दीक्षांत सोहळ्याचे आयोजन कुणासाठी केले, असा प्रश्न संभाजी ब्रिगेड, एआयएसएफने उपस्थित केला आहे. अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा दरवर्षी २० डिसेंबर रोजी गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात येतो. मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे दीक्षांत सोहळा लांबणीवर पडला. असे असताना विद्यापीठ प्रशासनाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनी दीक्षांत सोहळा न घेता पाहुण्यांच्या तारखेप्रमाणे २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात येत आहे.

गाडगेबाबा यांच्यापेक्षा आमंत्रित पाहुणे मोठे कसे झाले, असा सवाल संभाजी ब्रिगेड, एआयएसएफने उपस्थित केला आहे. गाडगेबाबांची जयंती मोठी की, पाहुण्यांसाठी मॅनेज केलेली तारीख मोठी, विद्यापीठाच्या अधिकारी, प्राधिकारिणीला कळू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. दीक्षांत सोहळा २३ फेब्रुवारी रोजी आयोजन करून विद्यार्थ्यांना याच दिवशी पदवी, पदकांनी सन्मानित करावे, अन्यथा हा सोहळा उधळून लावू. होणाऱ्या परिणामाला विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शुभम शेरेकर, याेगेश चव्हाण, कैलास चव्हाण, नीलेश सोनटक्के, राहुल खोडके, रोहन देढे, योगेश चव्हाण आदींनी निवेदन सादर केले.

Web Title: Sambhaji Brigade, AISF gave warning Amravati university