पॉलिथीनमधून गावठी दारुची विक्री

By Admin | Updated: July 1, 2015 00:39 IST2015-07-01T00:39:25+5:302015-07-01T00:39:25+5:30

बेनोडा (शहीद) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातुर्णा, वघाळ, वंडली येथे पॉलिथीनमधून तर वरुड, शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या ...

Sale of paternal alcohol by polyethylene | पॉलिथीनमधून गावठी दारुची विक्री

पॉलिथीनमधून गावठी दारुची विक्री

महिलांचे आंदोलन निष्फळ : वरूड तालुक्यातील युवापिढी व्यसनाच्या आहारी
संजय खासबागे अमरावती
बेनोडा (शहीद) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातुर्णा, वघाळ, वंडली येथे पॉलिथीनमधून तर वरुड, शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारुची विक्री सर्रास सुरु आहे. दारुविक्रीवर कुणाचाही अंकुश नसल्याने गावातील युवापिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. दारुबंदीसाठी येथील महिलांनी अनेकवेळा आंदोलनेसुध्दा केली. परंतु पाहिजे तशी दखल प्रशासनाने घेतली नसल्याने हा व्यवसाय फोफावला आहे.
तालुक्यात गावठी दारुच्या भट्ट्या असून वघाळ, वंडली, हातुर्णा, वाडेगाव, गाडेगांव, गणेशपूर, पुसला, करवार, सांवगी, सातनूर, रवाळा, झटामझीरी, कुमंदरा, लोणीसह परिसरात मद्यपींना ग्लास, बॉटल सोडून पॉलिथिनमध्ये गावठी दारु देण्यात येत आहे. हातूर्णा येथील महिलांनी दोन वर्षापूर्वी आंदोलन करुन ग्रामसभासुध्दा धेतली होती. कायमची दारुबंदी व्हावी, अशी मागणी होती. परंतु गावठी दारु विक्रीचा धंदा दिवसेंदिवस वाढतच आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असून केवळ मूकसंमतीने दारु विक्री सुरु असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जाते. सोबत सट्टा, जुगारालाही उधाण आल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मद्यपी दारु मागताना पन्नी, असा उल्लेख करतो. दारुविक्रीचा हा नवा फंडा आल्याने कुणालाही शंकाही येत नसल्यामुळे परिसरातील तरुण, लहान मुलेसुध्दा मार्गाकडे वळत आहेत. त्यामुळे महिला, नागरिकांमध्ये असंतोष उफाळत आहे. काही महिन्यांपूर्वीर् याच भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावठी दारुची भट्टी उध्वस्त क रुन शेकडो लिटर मोहाचा सडवा नष्ट केला. तरीसुध्दा भागात दारुची निर्मिती आणि विक्री सुरुच आहे. वर्धा जिल्हा लागून असल्याने लगतच्या द्रुगवाडा येथील मद्यपी येथे येत असल्याने दारु विक्रीचा धंदा तेजीत आला आहे. या व्यवसायाला पायबंद घालणे आवश्यक असताना पोलीस प्रशासन बध्याची भूमिका घेत आहेत.

शाळकरी मुलांनाही लागले दारुचे व्यसन ?
अवैध दारुविक्रीमुळे अनेक गावांना रात्रीच्या वेळी यात्रेचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळते. यात युवकही मागे नाहीत. दारुचे व्यसन तालुक्यातील युवकांनाही जडले आहे. व्यसनाधिनतेला आळा घालण्याऐवजी प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र वरुड तालुक्यात दिसून येत आहे. ही चिंतेची बाब असून गावागावांतील तंटामुक्त समितीसुध्दा दारुबंदीच्या कामात निरर्थक ठरत आहे. दारुबंदीसाठीचे प्रयत्न केवळ कागदोपत्री गुण घेऊनच पुरस्कारास पात्र ठरत आहेत.

मद्यपी वाहनचालकांची संख्या वाढल्याने अपघातात वाढ
महागडी विदेशी दारु घेण्याची ऐपत नसल्याने गावठी दारु पिण्याकरिता सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भट्टीवर तर गावाशेजारी असलेल्या काही गावांतील अवैध दारु विक्रीच्या ठिकाणी जाऊन आपली इच्छा भागविणारे नागरिक मद्य प्राशन केल्यानंतर भरधाव वाहने चालवितात. यातूनच अनेक अपघात घडत असल्याने अनेकांना प्राणाला मुकावे लागले, तर कुणाला कायमचे अपंगत्व आले. हे केवळ मद्य प्राशनकेल्यामुळे झाले असून दुचाकीच्या अपघातात वाढ झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

देशी दारु दुकानातून होतो अवैध दारुचा पुरवठा !
तालुक्यातील शेंदूरजनाघाट, बेनोडा, आमनेर, वरुड आणि राजुराबाजार येथे देशी दारु विक्री करणारे परवानाधारकांचे दुकान आहे. परंतु ग्रामीण भागात देशी दारुचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करुन अधिक भावाने अवैध दारु विक्री होत आहे. गावागावांत छुप्या मार्गाने देशी-विदेशी दारु विकली जात आहे. अनेकवेळा कारवाया करुनही अवैध दारु विक्रीला चपराक बसलेली नाही. दारुविक्रेत्यांचे पोलिसांसोबत आर्थिक संबंध असल्याचा आरोप शिस्तप्रिय नागरिकांनी केला आहे. दारुविक्री सुरु असल्याने महिला मंडळ, सर्वसामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. यासाठी अनेक गावांतून तक्रारी वरिष्ठापर्यंत पोहोचल्या असतानाही थातूरमातूर कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे.

Web Title: Sale of paternal alcohol by polyethylene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.