अंबादेवी मंदिराच्या अंगारा पात्रात मेलेली पाल
By Admin | Updated: May 5, 2017 00:08 IST2017-05-05T00:08:22+5:302017-05-05T00:08:22+5:30
समोसा, कचोरी अथवा पॅकबंद पाकिटातील खाद्यपदार्थांमध्ये मृत पाली अथवा अळी आढळल्याच्या घटना उघडकीस येत असतानाच

अंबादेवी मंदिराच्या अंगारा पात्रात मेलेली पाल
भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न : विश्वस्त, कर्मचाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष
अमरावती : समोसा, कचोरी अथवा पॅकबंद पाकिटातील खाद्यपदार्थांमध्ये मृत पाली अथवा अळी आढळल्याच्या घटना उघडकीस येत असतानाच अंबादेवी मंदिरातील अंगारा पात्रातही मृत पाल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरातील प्रसिद्ध आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबादेवी मंदिरात हा प्रकार घडल्याने भाविकांच्या आरोग्याचा, विश्वसनीयतेचा आणि श्रद्धेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक संताजीनगर येथील रहिवासी संजय गुल्हाने यांचा २९ एप्रिल रोजी वाढदिवस होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही संजय हे सकाळी ७.१५ वाजता अंबादेवी मंदिरात सहकुटूंब दर्शनासाठी गेले. देवीचे दर्शन घेऊन दक्षिणा देण्यासाठी काऊन्टरवर पावती फाडत असताना त्यांची दोन मुले अंगारा घेण्यासाठी पात्राजवळ गेली. अंगारा हाती घेत असताना त्यांना पात्रात मृत पाल दिसली. मुलांनी ही माहिती वडिलांना दिली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. अंगारा पात्रात पाल असल्याचे आढळताच संजय यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कॅमेऱ्याबद्ध केला. त्यानंतर ही माहिती त्यांनी दक्षिणा स्वीकारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला दिली. या महिला कर्मचाऱ्याने अंगारा असलेल्या लोखंडी पात्रात पाल असल्याचे सहकारी कर्मचाऱ्यांना सांगितले.
पुन्हा पाल न दिसण्याची खात्री काय ?
अमरावती : लगेच मंदिरात धावाधाव सुरू झाली. त्यानंतर अंबादेवी मंदिरातील कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ही पाल बाहेर काढून अंगारा पात्र इतरत्र हलविले.
मंदिरात भाविकांसाठी अंगारा पात्र लाडूविक्री होणाऱ्या केंद्राजवळ ठेवण्यात येत होते. मंदिरासारख्या पवित्रस्थळी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत जात नसेल तर अन्य क्षेत्राचे काय, हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मंदिरात भाविक हे मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. दर्शन घेऊन परतताना अंगारा जीभेवर किंवा कपाळावर लाऊनच बाहेर पडतात. मात्र, अंबादेवी मंदिरातील अंगारा पात्रात किती दिवसांपासून मृत पाल असावी, हा देखील चिंतनाचा विषय आहे.
भाविकाला दिसली आणि त्याने तक्रार केली म्हणून ही पाल काढली गेली. यापुढे पुन्हा अंगाऱ्याच्या पात्रात पाल जाणार नाही, उंदरे फिरणार नाही, याची काय खात्री? (प्रतिनिधी)