अमरावती ‘स्मार्ट सिटी’च्या सेफ झोनमध्ये
By Admin | Updated: July 23, 2015 00:03 IST2015-07-23T00:03:12+5:302015-07-23T00:03:12+5:30
अमरावती शहराची स्मार्ट सिटी शहर योजनेत समावेश करण्याच्या दिशेने आगेकूच सुरू झाली आहे.

अमरावती ‘स्मार्ट सिटी’च्या सेफ झोनमध्ये
अमरावती : अमरावती शहराची स्मार्ट सिटी शहर योजनेत समावेश करण्याच्या दिशेने आगेकूच सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात सेफ झोनमध्ये प्रवेश केला असून राज्यातील १० शहरांमध्ये अमरावतीचे नाव स्मार्ट सिटीसाठी जाहीर होईल, अशी शक्यता बळावली आहे. सादर प्रस्तावानुसार १०० पैकी ९५ गुण अमरावती शहराने प्राप्त केल्याची माहिती आहे.
राज्य शासनाने स्मार्ट सिटी या योजनेत सहभागासाठी प्रस्ताव मागविले आहे. त्यानुसार महापालिकेने नगरविकास विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. प्रारंभी अमरावती शहराला ९२.५ गुण मिळाले होते. आॅडिट न केल्याबाबत बोट ठेवण्यात आले. परंतु एजी आॅफीसने आॅडिट केल्यामुळे ही बाब ग्राह्य धरली गेली. परिणामी नगरविकास विभागाने ५ गुण वाढविले. त्यामुळे मंगळवारपर्यंत ९२.५ गुणावर थांबलेला प्रस्ताव बुधवारी ९५ गुणांच्या पुढे सरकला. स्मार्ट सिटी योजनेच्या सेफ झोनमध्ये अमरावती शहराचा समावेश होणार असल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे अमरावती शहराचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा, यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. गत आठवड्यात त्यांनी राज्य शासनाकडे स्मार्ट सिटीत सहभागासाठी प्रस्ताव पाठवून नामांकन केले आहे. ५० कोटी रुपयांचे लक्ष्य गाठण्यासाठी आर्थिक स्त्रोत शोधत असताना अमरावती शहराची स्मार्ट सिटी क्रमवारी उंचावणे ही बाब शुभवर्तमान मानली जात आहे. नगरविकास विभागाच्या सहसचिवाकडे स्मार्ट सिटी संदर्भात आयुक्त गुडेवार यांनी बुधवारी प्रात्याक्षिक सादर केले. दरम्यान काही मुद्दे स्पष्ट करताना लेखापरीक्षणाचा मुद्दा आयुक्तांनी प्रकर्षाने मांडला.
२०१२ ते १४ या वर्षातील काही माहिती देखील आयुक्तांनी सादर केली. (प्रतिनिधी)