बडनेऱ्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीला मनाई
By Admin | Updated: July 12, 2014 23:26 IST2014-07-12T23:26:35+5:302014-07-12T23:26:35+5:30
बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. त्यावर सध्या काम सुरू असल्याने यंदा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पेरणी करण्यास रेल्वे प्रशासनाने

बडनेऱ्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीला मनाई
अमरावती : बडनेरा येथे प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. त्यावर सध्या काम सुरू असल्याने यंदा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पेरणी करण्यास रेल्वे प्रशासनाने मनाई केली आहे. येत्या काही दिवसांतच येथे कारखाना निर्मितीचा शुभारंभ होईल, असे संकेत आहे. त्याअनुषंगाने रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणी केली.
तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात बडनेऱ्यात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना मंजूर करण्यात आला. हा कारखाना कोठे निर्माण करावा. त्यानुसार बडनेरा येथे रेल्वे परिसरालगतच्या जमिनींचा शोध घेण्यात काही महिने निघून गेले. अखेर पाचबंगला परिसरात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना साकारण्यावर शिक्कामोर्तब झाले. सुमारे २५० कोटी रुपये खर्चून साकारला जाणाऱ्या या कारखान्याच्या निर्मितीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने पाटणा स्थित रेल्वेच्या बांधकाम विभागावर सोपविली आहे. एकूण १९६ एकर जमिनीवर उभारला जात असलेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने जमीन हस्तांतरणाची रक्कम लाभार्थ्यांना वितरितसुद्धा केली आहे. प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे १५ कोटी ३२ लाख रुपये वर्गवारीनुसार वाटप करण्यात आले आहे. काही रहिवाशांची समस्या असून ती सोडविण्यासाठी रेल्वे युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. या कारखान्याचा श्रीगणेशा करावयाचा असल्याने मुंबई मध्य रेल्वे विभागाचे अभियंता मोहन नाडगे यांनी जागेची पाहणी केली आहे. पाहणीनंतरचा वस्तुनिष्ठ अहवाल नाडगे हे रेल्वे प्रशासनाला सादर करणार असल्याची माहिती आहे.
आॅगस्ट महिन्यात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे भूमिपूजन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे जागेबाबतची वस्तुस्थिती आणि पीक पेरणीसंदर्भात काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याची माहिती आहे. हल्ली पावसाळा लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. मात्र या कारखान्यासाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीवर पेरणी करु नये, अशी नोटीस बजावून त्यांना अलर्ट करण्यात आले आहे. किंबहुना पेरणी केल्यास होणाऱ्या नुकसानीला स्वत: प्रकल्पग्रस्त जबाबदार राहतील, असे रेल्वेने म्हटले आहे. या कारखान्यासाठी लवकरच संरक्षण भिंत उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. त्याकरिता अभियंता नाडगे यांनी बोरगावपर्यंत जमिनीची पाहणी केली आहे. या कारखान्याचे लवकर भूमिपूजन करण्यात यावे, याकरिता रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी खा. अडसूळ यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)