‘सायन्स एक्स्प्रेस’ला अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 23:17 IST2017-07-30T23:17:26+5:302017-07-30T23:17:56+5:30
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी ....

‘सायन्स एक्स्प्रेस’ला अलोट गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी देशभर भ्रमंती करणाºया ‘सायन्स एक्स्प्रेस’ला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी रविवारी अलोट गर्दी केली. अमरावती रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक चारवर सायन्स एक्स्प्रेसने पाणी, पर्यावरण, बदलत्या वातावरणातील जनजागृतीचा संदेश दिला.
सायन्स एक्स्प्रेस प्रदर्शनीचे उद्घाटन खा. आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. सुनील देशमुख, सायन्स एक्स्प्रेसचे व्यवस्थापक रूबल बोरा, अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आर.टी. कोटांगळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, शिवसेना महानगरप्रमुख सुनील खराटे, वाणिज्य निरीक्षक व्ही.डी.कुंभारे, प्रकाश मंजलवार, सुनील भालेराव, गणेश उसरे, ए.के.कुटी आदी उपस्थित होते.
सायन्स एक्स्प्रेसने आतापर्यंत १ लाख ५६ हजार ५५० किलोमीटरचा प्रवास केला आहे.
मागील आठ वर्षांपासून विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थी, तरूण पिढीमध्ये जागृती करण्याचे काम केले जात आहे. या उपक्रमांतर्गत यंदा पाणी आणि वातावरणातील प्रदूषणावर जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या ट्रेनने भुसावळ मध्य रेल्वे विभागात प्रवेश केल्यानंतर अकोला, मुर्तिजापूर त्यानंतर अमरावती असा प्रवास केला आहे. खा.आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने अमरावतीकरांना ‘सायन्स एक्स्प्रेस’ला भेट देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. देशापुढे पाणी आणि वायू प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाल्याने आगामी पिढीला या प्रदूषणाची जाणीव व्हावी आणि त्यांनी प्रदूषणमुक्तीसाठी तत्पर असावे, असा संदेश देत ‘सायन्स एक्स्प्रेस’ रविवारी अमरावतीत दाखल झाली. ‘सायन्स एक्स्प्रेस’ रविवारी येणार ही जनजागृती अगोदरच शाळा, महाविद्यालयांमध्ये करण्यात आली होती. त्याअनुषंगाने रविवारी सुटी असल्याने विद्यार्थ्यांनी पालकांसह प्लॅटफॉर्मवर गर्दी केली होती.
याट्रेनमध्ये असलेल्या सुमारे ३०० मॉडेल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात आला. रविवारी सायंकाळपर्यंत ५० हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या रेल्वेला भेट दिल्याची नोंद येथील नोंदवहीत असल्याची माहिती अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आर.टी.कोटांगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सायन्स एक्स्प्रेसला भेट देण्यासाठी सकाळी १० वाजपासून अमरावती रेल्वे स्थानकावर विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
जयस्तंभ चौक मार्ग आणि रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. सायन्स एक्स्प्रेसला भेटी देताना गोंधळ होऊ नये, यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक सी.एच. पटेल, बडनेरा रेल्वे पोलीस निरीक्षक पंकज चक्रे यांच्यासह सुरक्षा व्यवस्था तैनात होती. आरोग्य व्यवस्थेसाठी भुसावळ येथून रेल्वेची विशेष चमू दाखल झाली होती.
पाणी प्रदूषणामुळे उद्भवलेल्या धोक्यावर उपाययोजना आणि उपचाराविषयी १३ डब्यांच्या सायन्स एक्स्प्रेसमधून जनजागृती केली जात आहे. जैवविविधतेविषयीची माहिती, हवाप्रदूषण, जागृती अभियान चालविले जात आहे.
- आनंदराव अडसूळ
खासदार, अमरावती.
देशभरात सायन्स एक्स्प्रेसच्या माध्यमातून भ्रमंती करीत असताना तरुण, विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अमरावतीत देखील ५० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भेटी देऊन प्रदर्शनीचा लाभ घेतला आहे.
- रुबल बोरा
व्यवस्थापक, सायन्स एक्स्प्रेस