साईबाबा ट्रस्टच्या वार्षिक अहवालात घोळ
By Admin | Updated: October 11, 2015 01:37 IST2015-10-11T01:37:56+5:302015-10-11T01:37:56+5:30
साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयात दिलेल्या वार्षिक अहवालात घोळ केल्याचा आरोप माहिती ...

साईबाबा ट्रस्टच्या वार्षिक अहवालात घोळ
माजी व्यवस्थापकांचा आरोप : न्यायालयीन प्रकरण, तक्रारीचा हवाला
अमरावती : साईनगरातील श्री साईबाबा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयात दिलेल्या वार्षिक अहवालात घोळ केल्याचा आरोप माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीवरून माजी व्यवस्थापक अविनाश ढगे यांनी केला आहे. त्यातच ट्रस्टने विलंब झालेल्या अहवालाला न्यायालयीन प्रकरणे व भक्तांच्या तक्रारीला हवाला दिला.
साईबाबा ट्रस्टने उत्पन्नाचा अहवाल धर्मदाय आयुक्त कार्यालयात विलबांने सादर केला. विलंब झाल्याची स्पष्ट लेखी कबुली दिल्याचा पुरावा माहितीच्या अधिकारात ढगे यांच्या हाती लागला आहे. चुकीच्या धोरणामुळे लागलेल्या विलंबाला व न्यायालयीन प्रकरणे व भक्तांच्या दानाची रक्कम निरर्थक खर्च होत असल्याचा आरोप ढगे यांनी केला आहे. ट्रस्टतर्फे धर्मदाय आयुक्त कार्यालयात दिलेल्या अहवालाच्या विवरणात तफावत आढळली असतानाही ट्रस्टवर कारवाई करण्याऐवजी संशयास्पद अहवालातील नोंदींना मान्यता दिल्याने धर्मदाय आयुक्त कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात आहे. वार्षिक अहवालाच्या अनुसूची १० मधील नोंदीत २००३-०४ नंतर थेट २०००६-०७ चे विवरण देण्यात आले आहे. त्यानंतरही काही वर्षाच्या विवरणाच्या आकडेवारीत तपावत असल्याचे अहवालावरून उघड झाले. त्यामुळे वार्षिक हिशेबात प्रचंड अनियमितता असल्याचा ढगे यांनी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीवरून उघड केले. साईबाबा ट्रस्ट सार्वजनिक ट्रस्ट असून धर्मदाय आयुक्त कार्यालयाने ट्रस्टच्या अंधाधुंद कारभारावर अंकुश लावावा, अशी मागणी माजी व्यवस्थापक ढगे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.