नोटबंदी : वारंवार नोट बदलण्यासाठी येणाऱ्यांना चापअमरावती : नोट बदलविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाई लावण्याच्या रिर्झव्ह बँकेच्या निर्णयाच्या धसक्याने गुरूवारी बँका व एटीएमसमोरची गर्दी ओसरलेली दिसली, तर दुसरीकडे शहरातील कोणत्याही बँकेत नागरिकांच्या बोटावर शाई लावण्यात आली नसल्याचे दिसले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.केंद्र सरकारने चलनातील पाचशे व एक हजाराच्या नोटा व्यवहारातून बाद केल्यामुळे त्या बदलून घेण्यासाठी धनदांडग्यांकडून वेगवेगळी शक्कल लढविली जात आहे. त्याचबरोबर इतरांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याचेही प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहेत. वारंवार त्याच व्यक्ती बँकांमध्ये नोटा बदलविण्यासाठी दिसत होत्या. कमिशन तत्त्वावर हे काम सुरू होते. मात्र मंगळवारी रिझर्व्ह बँकेने नोटा बदलवून घेणाऱ्यांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे याचा धसका अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे शहरातील बँकांकडे कुणीही फिरकले नसल्याने गर्दी कमी दिसत होती. नोटबंदीमुळे बँकेच्या रांगेत तासन्तास उभे राहावे लागत आहे. यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. परंतु याचा फायदा काही दिवसांनंतर नक्कीच मिळणार आहे. आपण नेहमी देवाच्या दर्शनासाठी मंदिराच्या रांगेत उभे राहतोच तसेच आता बँकेच्या रांगेत एकदा उभे राहावे लागले तर काहीच फरक पडत नाही, अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून येत आहेत. (प्रतिनिधी)शासनाने नोटा बदलवून देताना नागरिकांच्या हाताच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी तूर्तास झालेली नाही. बोटावर शाई न लावता ५०० व हजारांच्या नोटा स्वीकारल्या जात आहे. - सुनील रामटेके, जिल्हा प्रबंधक, अग्रणी बँककाय म्हणतात नागरिक ?पैसे भरायला यायचे म्हणून आम्ही सकाळपासूनच घरातून निघालो. नंबर लवकर लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु खुप गर्दी आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक काही करू शकत नाही. मोदींचा निर्णय चांगला असल्याने थोडा त्रास झाला तरी चालेल, अशी प्रतिक्रया शोभा कावरे यांनी दिली.नोटबंदी निर्णयाचा मध्यमवर्गीयांना खूप त्रास होत आहे. निर्णय चांगला असल्याने याला साथ देत आहोत. पण सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सुटे पैसे नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही गर्दी काही दिवस तशीच राहणार असल्याची प्रतिक्रिया पंजाबराव उके यांनी दिली.
शाईच्या धसक्याने गर्दी ओसरली
By admin | Updated: November 18, 2016 00:19 IST