पान २ लीड
नकोशा रस्त्यांनी घात, एकाच दिवशी तीन बस नादुरुस्त, प्रवास करायचा कसा?
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : सर्वांच्या जिवाभावाची, सुखदुःखात साथ देणारी, ग्रामीण भागाची ‘जीवनवाहिनी’ एसटी बस ग्रामीण भागातील खड्ड्यांच्या रस्त्यावर वारंवार बंद पडत आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यात एकाच दिवशी तीन बस नादुरुस्त झाल्या. या बसमधून प्रवास करायचा तरी कसा, हा प्रश्न प्रवासी करीत आहेत.
‘गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी’ ही घोषणा अंमलात आणण्यासाठी राज्य शासनाने एसटी गावागावांत पोहचवल्या. लॉकडाऊननंतर ग्रामीण भागातील दळणवळण सुरळीत झाले. शाळा सुरू झाल्या. मात्र, एसटी बंद आहे. त्यामुळे इयत्ता नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना शहरात शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे परिवहन महामंडळाने लांब पल्ल्याच्या तसेच जिल्हा मुख्यालयी एसटी सुरू केल्या. मात्र, त्यांच्या चाकाखालील खड्ड्यांमुळे नादुरुस्त होण्याचे ग्रहण कायम आहे. त्यामुळे दरदिवशी बस रस्त्याच्या कडेला नादुरुस्त अवस्थेत आढळून येत आहेत. खराब रस्त्यांमुळे गाडी चालवणे अशक्य होत असल्याच्या तक्रारी अनेकदा चालकांनी परिवहन महामंडळाकडे केल्या आहे.
---------------
एकाच दिवशी तीन बस नादुरुस्त
चांदूर रेल्वे, पुलगाव या उपगाराच्या तीन एसटी बस सोमवारी एकाच दिवशी नादुरुस्त होऊन रस्त्याच्या क़डेला उभ्या झाल्या. वर्धा-अमरावती फेरी करणारी पुलगाव आगाराची एम एच ४० एन ८६०१, याच आगाराची हिंगणघाट-अमरावती फेरी करणारी बस (एम एच ४० एन ८७११) तसेच चांदूर रेल्वे आगाराची एम एच ४० ८६६२ क्रमांकाची बस या तिन्ही धनोडी- चांदूर रेल्वे रस्त्यावर नादुरुस्त पडल्या. यामुळे प्रवाशांना रस्त्यावर एक तास ताटकळत राहण्याची वेळ आली होती. या तिन्ही एसटी सुपरफास्ट होत्या, हे विशेष.
-------------
रस्त्यांनी केली बिकट वाट वर्धा ते अमरावती मार्गातील पुलगाव-देवगाव तसेच चांदूर रेल्वेपर्यंत रस्ता पूर्णतः खड्डेमय आहे. यवतमाळहून देवगाव व धामणगाव हा रस्ता समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पूर्णतः खराब झाला आहे. कुऱ्हा-अंजनसिंगी-धामणगाव या रस्त्यात बांधकामामुळे खड्डे आहेत. या रस्त्याने पायी चालणेही अवघड आहे.
------------
वेग मंदावला, प्रवाशांसाठी आजाराचे ‘गिफ्ट’
खराब रस्त्यामुळे एसटी चालकांच्या त्रास वाढला आहे. खड्ड्यांमुळे एसटीचे भाग आणि स्प्रिंग तुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच एसटीचे अनेक भाग जुने व भंगार आहेत. यामुळे वेळापत्रक पाळण्यास अडचण येत आहे. प्रवाशांच्या मान आणि कंबरदुखीचा त्रासही वाढला आहे.