धावत्या स्कूल व्हॅनला आग
By Admin | Updated: November 19, 2016 00:06 IST2016-11-19T00:06:18+5:302016-11-19T00:06:18+5:30
धावत्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याने प्रचंड खळबळ उडालीे.

धावत्या स्कूल व्हॅनला आग
ट्रान्सपोर्टनगरातील घटना : अग्निशमन दलाला पाचारण, विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला
अमरावती : धावत्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याने प्रचंड खळबळ उडालीे. ही घटना अमरावती वलगाव मार्गवरील ट्रान्सपोर्टनगरमध्ये शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता घडली. सुदैवाने या स्कूलव्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करून पेटती स्कूलव्हॅन विझविण्यात आली.
शॉर्ट सर्किटमुळे एम.एच. २७-बी.एफ. १९८ क्रमांकाच्या धावत्या स्कूलबसने अचानक पेट घेतला. ही आग व्हॅनच्या चालकाच्या बाजूला लागल्यामुळे घाबरलेल्या चालकाने वाहन थांबवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. यामध्ये स्कूलव्हॅनचा समोरचा भाग पूर्णपणे जळाला. स्कूल व्हॅनमध्ये लावलेल्या ‘गॅस किट’चा स्फोट होण्याच्या भीतीने कुणीही पुढे येण्यास धजावत नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. नागपुरीगेट पोलिसांना याघटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.ए.भगत यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पण, ही घटना ही गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने जळालेली स्कूल व्हॅन गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. असून ही कार निदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ने-आण करीत असल्याची माहिती आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी जात होती. सदर स्कूल व्हॅन ही विद्यार्थ्यांना ‘फालकॉन स्कूल’ मध्ये सोडल्यानंतर ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. स्कूल व्हॅनवर सुध्दा ‘फालकॉन स्कूल’ असे लिहिले होते. शाळेत विद्यार्थ्यांना ने आण करायची. शाळकरी विद्यार्थ्यांना ने-आण करताना ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता अशी चर्चा घटनास्थळी होती. दरम्यान या व्हॅनचा चालक घटनास्थळावरून निघून गेल्याने त्याचे नाव पोलिसांना कळू शकले नाही. घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
‘आरटीओ’ने वेळोवेळी तपासाव्यात स्कूल व्हॅन
शहरात आरटीओच्या नोंदणीकृत ६३० स्कूल व्हॅन व बसेस आहेत. परवाना काढताना घालून दिलेल्या नियमानुसार या स्कूल व्हॅन चालतात किंवा नाही, यासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वरचेवर व्हॅन्सची तपासणी केली पाहिजे. स्कूल व्हॅनमध्ये अनाधिकृत गॅस किटचा वापर होत असेल व क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक होत असेल तर कारवाई करावी.
४८ वाहनांवर कारवाई
मागील चार महिन्यात ४८ स्कूल व्हॅन व बसेसवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने उन्हाळयात सर्व स्कूल बसेसची तपासणी आरटीओद्वारे करण्यात आली. यानंतरही नेहमीत तपासणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.