सुमधूर गीतांनी धुंद झाले रसिक
By Admin | Updated: September 13, 2015 00:02 IST2015-09-13T00:02:21+5:302015-09-13T00:02:21+5:30
‘रिमझिम गिरे सावन...सुलग-सुलग जाए मन’ धनश्री देशपांडे हिच्या सुमधुर आवाजातील गीताने श्रोतृवृंद मंत्रमुग्ध झाला.

सुमधूर गीतांनी धुंद झाले रसिक
‘दिल ने फिर याद किया’ कार्यक्रम : ‘लोकमत’, सिम्फनी ग्रुपचा उपक्रम
अमरावती : ‘रिमझिम गिरे सावन...सुलग-सुलग जाए मन’ धनश्री देशपांडे हिच्या सुमधुर आवाजातील गीताने श्रोतृवृंद मंत्रमुग्ध झाला. त्यानंतर पार्श्वगायक गुणवंत डहाणे यांनी सादर केलेल्या ‘दिल ढुंढता है..फिर वही’ या गीतावर श्रोत्यांच्या टाळ्या पडल्या. अख्खे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह टाळ्यांच्या गजराने निनादून गेले होते. ‘दिल ने फिर याद किया’ हा कार्यक्रम अशा एकापेक्षा एक सरस गीतांमुळे अविस्मरणीय ठरला.
‘लोकमत’ सखी मंच व सिंफनी ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने अमरावती शहरातील नामवंत गायक कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘गौरव महाराष्ट्रा’चा फेम धनश्री देशपांडे ही कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होती. त्यानंतर पार्श्वगायक गुणवंत डहाणे, गायक संतोष बाहे, सीमा चक्रवर्ती यांनी कसदार आवाजात लता मंगेशकर, आशा भोसले, मो. रफी, मुकेश यांच्या गाण्यांची एकापेक्षा एक मेजवानीच सादर केली.
सचिन गुढे व त्यांच्या सिम्फनी ग्रुपच्या वाद्यवृंदांसोबत सादर झालेल्या या गाण्यांना वेगळीच रंगत चढली होती. सीमा चक्रवर्ती यांनी गायिलेल्या ‘नुरी..नुरी’ या गाण्याला रसिक प्रेक्षकांनी ‘वन्स मोअर’ दिला. त्यानंतर धनश्री देशपांडे यांनी सादर केलेल्या हिरो चित्रपटातील ‘तू मेरा जानू है’ या गाण्यांवर श्रोते अक्षरश: थिरकले. संतोष बाहे यांनी मुकेशची सदाबहार गाणी सादर केली. पार्श्वगायक गुणवंत डहाणे यांनी मो. रफी यांची बहारदार गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
जुन्या काळातील गाणी त्याचवेळच्या वाद्यवृंदांसोबत सुरेल रितीने वाजवून सचिन गुढे यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. त्याचवेळी सोनू गुढे यांच्या ‘ड्रम सेट’ व तबल्याच्या जुगलबंदीने प्रेक्षकांना मोहित केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन संजीव जयस्वाल व संगीता रिठे यांनी केले. कार्यक्रमाला महापौर चरणजीतकौर नंदा, पुरूषोत्तम चौधरी, विलास मराठे, नगरसेवक दिनेश बूब, बबन बेलसरे, बी.एन. राठी, दीपक खंडेलवाल, चंद्रकांत पोपट, सुरेंद्र काळबांडे, 'लोकमत'चे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे, संपादकीय प्रमुख गणेश देशमुख हे उपस्थित होते. (प्रतिनिधी)