आरटीओत दलालराज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 00:06 IST2016-07-02T00:06:46+5:302016-07-02T00:06:46+5:30
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच बाहेरसुद्धा दलालांचा सुळसुळात असून नागरिकांजवळून शिकाऊ परवाना व दुचाकी, चारचाकी वाहनांचा परवाना काढण्यासाठी हजारो रुपये उखळल्या जात आहे.

आरटीओत दलालराज!
अधिकाऱ्यांचे अभय : नागरिकांची लूट
संदीप मानकर अमरावती
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच बाहेरसुद्धा दलालांचा सुळसुळात असून नागरिकांजवळून शिकाऊ परवाना व दुचाकी, चारचाकी वाहनांचा परवाना काढण्यासाठी हजारो रुपये उखळल्या जात आहे. याला आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असून सर्वत्र दलालराज फोफावला आहे.
'लोकमत'च्या प्रतिनिधीने आरटीओ कार्यालयात फेरफटका मारला असता समस्यांचे महापूर पहायला मिळाला. अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पाच जिल्हयाचे कामकाज चालते. त्यामुळे येथे विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा राबता असतो. त्यामुळे येथे अनेक दिवसांपासून दलालराज फोफावला आहे. कुठलेही काम असल्यास हे दलाल नागरिकांना बोटावर मोजण्या इतक्या दिवसात करून देतात व येथूनच सुरू होते विद्यार्थ्यांसह नागरिकांची लूट. येथे येणाऱ्या नागरिकांना प्रवेशव्दाराच्या बाहेर किंवा आवारातच घेरले जाते. तेथे आपणाला कुठले काम आहे, हे विचारले जाते. कुठल्या वाहनांचा परवाना हवा, यासंदर्भात विचारणा करण्यात येते. नागरिकांनी होकार देताच कामाचे दर ठरतात. या दलाललांकडू साहेब माझ्या ओळखीचे आहे, अशी पुष्टी त्यांना दिली जाते. तुम्ही स्वत: जाऊन काम केले तर एवढे पैसे लागतील व लवकर काम होणार नाही. वेळ पडल्यास कागतपत्रे नसतील तर कामच होणार नाही, अशी भीती संबंधितांन दाखविली जाते व येथूनच दलालांचा पैसे लुटण्याचा गौरखधंदा सुरू होतो. आरटीओ परिसरात व कार्यालयाबाहेर ३०० ते ४०० दलाल आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांपेक्षा आरटीओ कार्यालयात दलालांचीच गर्दी जास्त असते. त्यामुळे हे दलाल आरटीओ कार्यालय परिसरात शिरतातच कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. याला आरटीओच्या अनेक परिवहन अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्याचे अभय का, असा प्रश्न येथे येणारे नागरिक विचारत आहेत.
शिकाऊ लायसन्सचे ३०० तर परवान्याचे ७०० रुपये
नियमांने जर नागरिकांनी शिकाऊ लायसन्स काढले तर ते ३१ रुपये शुल्क भरून मिळते. दुचाकी, चारचाकी वाहनांचा परवाना काढयांचा असेल तर ३१६ मोटरवाहन परवाना व युटीएल (युनायटेड टेलीकॉम लि.) शुल्क भरून परवाना काढला जातो. प्रत्येक परवाना क्लासप्रमाणे त्याचे शुल्क वाढतात. पण बाहेर किंवा दलालाच्या तावडीत जर नागरिक सापडला तर लर्निंग लायसन्सचे ३०० रुपये तर परवान्याचे ७०० ते १०००रुपया प्रमाणे पैसे उखडण्यात येते.
पीयूसी व्हॅनवर कारवाई केव्हा?
आरटीओ कार्यालया बाहेर रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करुन वाहने ठेवली जातात. येथे कार्यरत पीयूसी व्हॅनमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती आॅनलाईन करण्यासाठी ५० ते ८० रुपये शुल्क आकारले जातात. येथूनही वाहन परवाना काढून देण्याच्या नावावर पैसे उकळतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
विद्यार्थ्यांची लूट
येथे शिकाऊ परवान्यासाठी विद्यार्थी येतात. परंतु त्यांच्याजवळ टीसी.ची मूळ प्रत नसते. शिकाऊ परवाना काढण्यासाठी हे दाखविणे बंधणकारक आहे. नेमकी हीच संधी साधून गरजेनुसार तत्काळ काम करुन देण्याच्या नावावर साहेबांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून दलाल विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वापट रक्कम वसूल केले जाते.