राज्याच्या सीमा तपासणी नाक्यांवर आरटीओंचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST2021-06-16T04:16:52+5:302021-06-16T04:16:52+5:30

अमरावती : राज्याच्या सीमांवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवर आता परिवहन विभाग लक्ष ठेवणार आहे. या तपासणी नाक्यांवर आरटीओ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त ...

RTO's 'watch' at state border checkpoints | राज्याच्या सीमा तपासणी नाक्यांवर आरटीओंचा ‘वॉच’

राज्याच्या सीमा तपासणी नाक्यांवर आरटीओंचा ‘वॉच’

अमरावती : राज्याच्या सीमांवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवर आता परिवहन विभाग लक्ष ठेवणार आहे. या तपासणी नाक्यांवर आरटीओ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अवैध वसुली करणाऱ्या खासगी व्यक्तींना यामुळे चाप बसणार आहे.

राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ११ जून रोजी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले. सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यानुसार आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील विविध सीमा तपासणी नाक्यांवर खासगी व अनधिकृत व्यक्तींचा वावर असतो. अशा व्यक्तींकडून वाहनचालकांची अडवणूक, कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप, अडथळा निर्माण करणे, वाहनचालकांची कागदपत्रे अधिकार नसताना ताब्यात घेणे असे प्रकार होत असल्याचे लेखी, तोंडी तक्रारी या परिवाहन आयुक्तांकडे प्राप्त झाल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. सीमा तपासणी नाक्यांवर कार्यरत मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक हे गणवेशधारी अधिकारी आहेत. असे असताना कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमा तपासणी नाक्यांवर अनधिकृत खासगी व्यक्तींचा वावर, अनधिकृत कृत्य ही बाब गंभीर आहे. सीमा तपासणी नाक्यांवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. त्यामुळे विभागाची प्रतिमा मलीन होत आहे. सीमा तपासणी नाक्यांवर संबंधित अधिकाऱ्यांचे प्रभावी नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यांना अशा अनधिकृत वा खाजगी व्यक्ती सीमा तपासणी नाक्‍यांच्या परिसरात कारवाया करताना आढळून आल्यास, त्यांच्याविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.

बॉक्स

दरमहा द्यावा लागणारा अहवाल

आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तपासणी नाक्यांवरील संबंधित अधिकाऱ्यांची राहणार आहे. संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी व सीमा तपासणी नाकाप्रमुख उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी वेळोवेळी तपासणी नाक्यांना आकस्मिक भेट देऊन नियमित परीक्षण करावे व कामकाजाचा आढावा घ्यावा. त्याबाबतचा अहवाल दरमहा ५ तारखेपूर्वी परिवहन आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बॉक्स

जिल्ह्यात दोन सीमा तपासणी नाके

अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारीत जिल्ह्यातील दोन सीमा तपासणी नाके आहेत. यामध्ये वरूड आणि खरपी यांचा समावेश आहे.

कोट

सीमा तपासणी नाक्यावरील खासगी अनधिकृत व्यक्तींच्या वावराला प्रतिबंध घालण्याबाबत परिवहन आयुक्तांनी लेखी स्वरूपात आदेश दिले आहेत. त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे.

- राजाभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

Web Title: RTO's 'watch' at state border checkpoints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.