आरटीई शाळा नोंदणीस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST2021-02-14T04:13:22+5:302021-02-14T04:13:22+5:30
अमरावती : शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के प्रवेशासाठी शाळांनी नोंदणी ...

आरटीई शाळा नोंदणीस मुदतवाढ
अमरावती : शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटीई दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के प्रवेशासाठी शाळांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. परंतु शाळांकडून नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आरटीई शाळा नोंदणीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जिल्ह्यात २४७ शाळांपैकी जवळपास १८७ शाळांची नोंद झाली असून ६० शाळांची नोंदणी बाकी आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये संबंधित शाळांच्या नोंदणी करून घेण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. आरटीई प्रवेशाची २०२०-२०२१ ची प्रवेश प्रक्रिया नुकतीच संपलेली असताना २०२१-२०२२ च्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २१ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. परंतु दिलेल्या मुदतीत शाळांची नोंदणी झाली नसल्यामुळे अखेर नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून शाळांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वेळेवर देण्यात येत नाही अनेक शाळांची शुल्क प्रतिपूर्ती प्रलंबित आहे. त्यामुळे शाळा नोंदणी करण्यास टाळाटाळ करत आहे. अशातच आता शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाकरता शाळांना नोंदणी करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.