आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक घोषित
By Admin | Updated: March 6, 2017 00:08 IST2017-03-06T00:08:57+5:302017-03-06T00:08:57+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले आहेत.

आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक घोषित
जिल्ह्यातून ५ हजार ३० अर्ज : ७ मार्च रोजी पहिला 'ड्रॉ'
अमरावती : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले आहेत. त्यानुसार जिल्हाभरातून सुमारे ५ हजार ३० प्रवेश अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. तसेच शिक्षण विभागांतर्गत आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी ७ मार्च रोजी पहिली सोडत काढण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागातर्फे फेब्रुवारी महिन्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. शिक्षण विभागाच्या संकेस्थळावर २ मार्चपर्यत आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठीची मुदत होती. त्यानुसार पालकांनी आरटीईच्या जागांसाठी आॅनलाईन अर्ज केले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार नर्सरी, के.जी. १, के.जी.२, प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यात २१४ शाळा पात्र ठरल्या आहेत. आरटीईच्या सर्व प्रवेशासाठी सुमारे ५५०० जागा उपलब्ध आहेत. यासाठी जिल्हाभरातून ५ हजार ३० अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता पालकांचे लक्ष विद्यार्थ्याचे प्रवेशाकङे लागले आहे. शिक्षण विभागाने आरटीईच्या वेळापत्रकही जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार मंगळवार ७ मार्च रोजी पहिला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवेशासाठी साधारपणे ८ मार्चपासून आरटीईनुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर दुसरी, तिसरी आणि चौथी लॉटरी काढण्यात येणार आहे. यादरम्यान किती विद्यार्थ्याना प्रवेश मिळतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाईन प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र
२५ टक्के आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी रहिवासी वास्तव्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज, टेलिफोन बिल, घरपट्टी, पाणीपट्टी बिल, दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा, वाहन चालविण्याचा परवाना, वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग, अपंगत्व प्रमाणपत्र, एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला आर्थिक वर्ष २०१५-१६ चा कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आदी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.
भातकुली पं.स. सभागृहात सोडत
आरटीनुसार आॅनलाईन प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडे प्राप्त ५ हजार ३० अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची सोडत ७ मार्च रोजी भातकुली पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता काढण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पुरी यांनी सांगितले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा प्रवेशासाठी जिल्ह्यात २१४ शाळा पात्र ठरल्या आहेत. ५ हजार ३० अर्ज आमच्याकडे आले आहेत. लवकरच वेळापत्रकानुसार लॉटरी पध्दतीने राबविली जाईल
- एस. एम. पानझाडे,
शिक्षणाधिकारी प्राथमिक