आरटीई प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:40+5:302021-05-07T04:13:40+5:30
अमरावती : राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा अर्थात (आरटीई) अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेवर ...

आरटीई प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर
अमरावती : राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा अर्थात (आरटीई) अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेवर होत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गतवर्षीही कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये हे प्रवेश लांबणीवर पडले होते. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहिली. यंदासुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडत काढण्यात आली. १५ एप्रिलला सोडतीत पात्र असलेल्या पाल्याच्या पालकांना एसएमएसव्दारे प्रवेशाची तारीख कळविण्यात आली होती. त्यानुसार १९ एप्रिलपासून प्रवेश निश्चिती सुरू होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू झाल्याने आरटीई प्रवेशाला ब्रेक लागला. दरम्यान संचारबंदी लागू होण्यापूर्वी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने पालक व्हाॅट्सॲप किंवा ई-मेल कागदपत्रांच्या प्रती पाठवू शकतात तसेच ई स्वरूपातच कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर शुल्क भरून तात्पुरता प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. आता थेट संचारबंदीचे निर्बंध उठल्यानंतर प्रवेशासंदर्भातील निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ई स्वरूपातील कागदपत्रे पडताळणी रखडणार आहे.
बॉक्स
पालकांमध्ये संभ्रम
गतवर्षीप्रमाणे यंदाही आरटीई प्रवेश प्रक्रिया रेंगाळलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन लागू असल्याने प्रवेश निश्चितीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच आरटीई पोर्टलवर संचारबंदी नंतरच प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.