रुंदसरी, वरंबा पद्धतीची पेरणी आवश्यक
By Admin | Updated: June 28, 2015 00:35 IST2015-06-28T00:35:21+5:302015-06-28T00:35:21+5:30
कोरडवाहू क्षेत्रासाठी पाऊस हा एकमेव स्त्रोत आहे. नैर्ऋत्त्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाचे प्रमाणदेखील अनिश्चित आहे.

रुंदसरी, वरंबा पद्धतीची पेरणी आवश्यक
कमी पावसाच्या उपाययोजना : पावसाचे पाणी जिरविणे गरजेचे
अमरावती : कोरडवाहू क्षेत्रासाठी पाऊस हा एकमेव स्त्रोत आहे. नैर्ऋत्त्य मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाचे प्रमाणदेखील अनिश्चित आहे. ढोबळ मानाने चार महिने पाऊस पडतो. यामधील एक महिना जरी कोरडा गेला तरी उर्वरित पाऊस पिकाला पुरेसा राहील, असे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी पेरणीला रुंदसरी व वरंबा पद्धती वापरणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिके घेतली जातात. यामध्ये ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे, तर १५ टक्के क्षेत्रात संरक्षित सिंचनाची सोय आहे. जिल्ह्यात शेतकरी प्रामुख्याने उपलब्ध असलेल्या यंत्र सामग्रीचा वापर करुन पारंपरिक पध्दतीने शेती करतात. यामध्ये बियाण्यांचे असमान वाटप, जास्तीचे बियाणे, दोन रोपांमधील असमान अंतर, कुशल मजुरांची कमतरता, दिवसेंदिवस वाढणारी मजुरी, पेरणीसाठी लागणारा वेळ, यासारख्या अनेक समस्यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. यासाठी कृषी विद्यापीठ अकोला यांनी ट्रॅक्टरचलित रुंदसरी वरंबा टोकन यंत्र विकसित करुन कृषी औद्योगिक विकास महामंडळाव्दारे समोर आणले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपयोग होणार आहे. (प्रतिनिधी)
काय आहे
बीबीएफ यंत्र ?
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाव्दारे बीबीएफ (ब्रॉड बेड फरोज) किंवा रुंद वरंबा सरी टोकण आणि आंतरमशागत यंत्र विकसित केले आहे.
या यंत्राच्या माध्यमातून रुंद वरंबा सरी पाडून त्यावर पेरणी, खत देणे शक्य होते. दोन सऱ्यांमध्ये रुंद वरंबा तयार होऊन टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरणी होते.
पिकांना दोन ओळ आणि दोन रोपांमधील अंतरानुसार पेरणी करणे शक्य होते.
या पेरणीमुळे हवा आणि जमिनीतील ओलावा यांचे संतुलन राहून वरंब्यामध्ये ओलावा टिकून राहतो.
जिरलेल्या पाण्यावर
पिके तग धरु शकतात
बीबीएफ तंत्रज्ञानामुळे पावसाच्या काळात सरीमध्ये जमा झालेले पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण तयार झाल्याने वापसाची स्थिती निर्माण होते. पिकांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होते. या पाण्याच्या भरवशावर पिके १० ते १२ दिवस तग धरु शकतात. पाऊ स जास्त झाल्यास सरीव्दारे पाणी निघून जाते. पिकाच्या मुळासी पाणी साचून राहत नसल्याने नुकसान होत नाही.
कोरडवाहू पिकांसाठी बीबीएफ वरदायी
आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था हैद्राबाद (इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्युट) ही संस्था जगातील अविकसित देशात कार्यरत आहे. या संस्थेव्दारे प्रथम बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला व हे तंत्रज्ञान लोकप्रिय झाले. पावसाची अनिश्चितता असल्याने पीक जगविणे व उत्पादकता वाढविणे हा या तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. राळेगणसिध्दी येथे अन्ना हजारे व हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांनी याच तंत्रज्ञानाचा वापर करून समृध्दी निर्माण केली आहे.
कोरडवाहू शेतीसाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. पिकांच्या वाढीचा काळ असताना नेमका आपल्या भागात खंड पडतो. यावेळी सरी, वरंबा पध्दत, बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वरदान ठरते.
- केशवराव ठाकरे,
कृषिशास्त्रज्ञ (निवृत्त)