मोरगड येथील दहा घरांचे छप्पर उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:34 IST2019-04-22T22:33:57+5:302019-04-22T22:34:15+5:30
तालुक्यातील मोरगड येथे १६ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता वादळाच्या तडाख्याने जवळपास दहा घरांची छपरे उडाली. यात जीवित हानी झाली नाही. परंतु सहा दिवस उलटूनही तालुका प्रशासनातर्फे आर्थिक मोबदल्यासाठी कुठल्याच प्रकारचा पंचनामा करण्यात आला नाही. अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे आदिवासींमधून संताप व्यक्त होत आहे.

मोरगड येथील दहा घरांचे छप्पर उडाले
चिखलदरा : तालुक्यातील मोरगड येथे १६ एप्रिल रोजी रात्री दहा वाजता वादळाच्या तडाख्याने जवळपास दहा घरांची छपरे उडाली. यात जीवित हानी झाली नाही. परंतु सहा दिवस उलटूनही तालुका प्रशासनातर्फे आर्थिक मोबदल्यासाठी कुठल्याच प्रकारचा पंचनामा करण्यात आला नाही. अधिकाऱ्यांनी भेट न दिल्यामुळे आदिवासींमधून संताप व्यक्त होत आहे.
मोरगड येथे सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने दहा घरांवरील छपरे पत्त्यासारखी उडून गेली. काही कळायच्या आतच घरातूनच थेट आभाळ दिसू लागले. आदिवासी अक्षरश: घाबरून घराबाहेर पडत सुटले. या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरांची पडझड झाली. या नुकसानाची माहिती १७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता सरपंच व पोलीस पाटील यांनी परिसराचे पंचायत समिती सदस्य बन्सी जामकर यांना दिली. यासंदर्भात त्यांनी चिखलदराचे तहसीलदार मनीष गायकवाड यांना माहिती दिली, मात्र निवडणुकीत सर्व व्यस्त असल्यामुळे आपण तलाठी व संबंधितांना गावात पाठवित असल्याचे त्यांनी सांगितले. १७ एप्रिल रोजी जामकर यांनी भेट दिली. परंतु अद्यापही प्रशासनाकडून कुणीही पोहोचले नसल्याची माहिती जामकर यांनी दिली.चक्रीवादळाच्या तडाख्यात दिलीप बुडा जांबेकर, अजाब बुडा जांभेकर, अरुण जांबेकर, भास्कर सदाशिव सोनोने, राजा सोनाजी बेलसरे , सुनील बुडा जांभेकर, राजाराम धांडेकर, मनोहर झारू जांबेकर, मुला तूरु कास्देकर यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले.
सहा दिवस लोटून सुद्धा मोरगड येथील आदिवासी उघड्यावर आहेत. त्यांच्या घरांचे पंचनामे करून त्यांना शासकीय नियमाने तात्काळ मोबदला देण्यात यावा.
- बन्सी जामकर, सदस्य, पंचायत समिती चिखलदरा
पंचनामा करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार मदत करण्याची तजविज करण्यात आली. तहसील प्रशासनाकडून कुठलाही हलगर्जीपणा करण्यात आला नाही.
- मनीष गायकवाड,
तहसीलदार चिखलदरा