‘राँग साईड’ दुचाकीस्वाराने चिमुकल्याला उडविले
By Admin | Updated: September 1, 2016 00:09 IST2016-09-01T00:09:09+5:302016-09-01T00:09:09+5:30
भरधाव ‘राँग साईड’ वाहन चालवून एका सायकलस्वार चिमुकल्याला उडविणाऱ्या दुचाकीस्वारांना संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला.

‘राँग साईड’ दुचाकीस्वाराने चिमुकल्याला उडविले
संतप्त नागरिकांनी दिला चोप : समर्थ हायस्कूलनजीकची घटना
अमरावती : भरधाव ‘राँग साईड’ वाहन चालवून एका सायकलस्वार चिमुकल्याला उडविणाऱ्या दुचाकीस्वारांना संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला. ही घटना समर्थ हायस्कूल चौकात बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
मणीबाई गुजराती शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या रोहीत गुल्हाने हा समर्थ हायस्कूलनजीक सायकल घेऊन उभा होता. दरम्यान विरूद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकीने रोहितच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात रोहित गंभीर जखमी झाला. शाळकरी मुलाचा अपघात झाल्याचे पाहून शेकडो नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. रोहितला तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांनी घेतले ताब्यात
अमरावती : मात्र, प्रत्यक्षदर्शींचा रोष उफाळून आला होता. उपस्थित नागरिकांनी अपघात घडवून आणणाऱ्या दुचाकीवरील दोन्ही युवकांना बेदम चोप दिला. दुचाकीवरील दोन्ही युवक मद्यधुंद अवस्थेत विरुद्ध दिशेने वाहन आल्यानेच अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
नागरिकांनी दोन्ही युवकांनी बेदम मारहाण करीत असतानाच तेथे वाहतूक पोलीस पोहोचले. पोलिसांनी नागरिकांचा रोष पाहून दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. मात्र, नागरिकांचा रोष शांत होत नव्हता. पोलिसांच्या ताब्यातील दोन्ही युवकांना मारहाण करणे सुरुच होते. त्यामुळे नागरिकांसमोर पोलिसही हतबल झाले होते. थोड्याच वेळात जखमी रोहितचे काही नातेवाईक सुद्धा घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही दोन्ही युवकांना बदडणे सुरु केले. नागरिक व नातेवाईकांच्या मारहाणीमुळे दोन्ही युवक रक्तबंबाळ झाले होते. तणावाची स्थिती निर्माण होत असताना सीआरओ मोबाईल पोलीस व्हॅन घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा नोंदविला गेला नव्हता.