ंपॅनेलबाबतची भूमिका तळ्यात-मळ्यात
By Admin | Updated: July 29, 2015 00:25 IST2015-07-29T00:25:14+5:302015-07-29T00:25:14+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलबाबत सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे.

ंपॅनेलबाबतची भूमिका तळ्यात-मळ्यात
अमरावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनेलबाबत सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. अद्यापही सर्वपक्षीय पॅनेलबाबत वाटाघाटी झालेल्या नाहीत. मात्र सत्तेसाठी सोईची राजकीय खेळी ठरविण्यातच विविध राजकीय पक्ष कामाला लागले आहे. यामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप या राजकीय पक्षांनी पॅनेलनिर्मितीची तयारी चालविली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
बाजार समिती निवडणुकीमुळे अद्यापही राजकीय वातावरण फारसे तापलेले नाही. अमरावती व भातकुली तालुक्यातील मातब्बर पुढारी व राजकीय पक्षाचे बडेनेते यासाठी कामाला लागले असले तरी बाजार समितीबाबत राजकीय शांतता कायम असल्याचे दिसून येते. सर्वपक्षीय पॅनलमध्ये जागा वाटपाबाबत अपेक्षित संधी मिळत नसल्याने स्वतंत्र पॅनलनिर्मिती करुन लढण्याचा अनेकांचा विचार आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्व प्रमुख राजकीय पक्षांत केवळ तडजोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे बाजार समितीच्या राजकीय वातावरणात पॅनेलबाबत तळ्यात-मळ्यात अशी भूमिका आहे.
२० जुलैपासून अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम फार मोठा असल्याने अद्यापही इच्छुकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मंगळवारपर्यंत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्यांमध्ये ग्रामपंचायत मतदारसंघातून २, व्यापारी मतदारसंघातून २ आणि मापारी आणि तोलारी मतदारसंघातून दोन असे ६ उमेदवारांनी नामाकंन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहेत. आतापर्यंत सुमारे १०७ अर्जांची उचल करण्यात आली आहे.