रोखपाल सुटीवर, पोस्टात प्रचंड गर्दी
By Admin | Updated: September 22, 2015 00:21 IST2015-09-22T00:21:21+5:302015-09-22T00:21:21+5:30
स्थानिक डाक कार्यालयातील एका काउंटरवरील रोखपाल सुटीवर असल्यामुळे सोमवारी चक्क पैशाची देवाण-घेवाण बंद ठेवण्यात आले होते

रोखपाल सुटीवर, पोस्टात प्रचंड गर्दी
व्यवहार ठप्प : भोंगळ कारभार चव्हाट्यावर
चांदूररेल्वे : स्थानिक डाक कार्यालयातील एका काउंटरवरील रोखपाल सुटीवर असल्यामुळे सोमवारी चक्क पैशाची देवाण-घेवाण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचे निदर्शनास येताच युवक काँग्रेसचे नेते नीलेश विश्वकर्मा कार्यकर्त्यांसह पोस्ट कार्यालयात धडकले. त्यांच्या आक्रमकतेमुळे अखेर काउंटर सुरू करण्यात आले.
सोमवारी अनेक पोस्ट खाते धारक पैसे काढण्यास पोस्ट आॅफीसमध्ये गेले होते. मात्र एक रोखपाल सुटीवर असल्यामुळे सर्वात महत्त्वाचे आर्थिक व्यवहाराचे काउंटरच बंद ठेवण्यात आले होते. दुसरा कोणताही कर्मचारी ते काउंटर सुरू करण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे अनेक नागरिक, ज्येष्ठ नागरिकांना परत जावे लागले. त्यामुळे पोस्ट आॅफीसमधील नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात येताच युवक काँग्रेसचे नीलेश विश्वकर्मा कार्यकर्त्यांसमवेत टपाल कार्यालयात धडकले. पोस्टमास्तरकडूुन समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे विश्वकर्मा चांगलेच आक्रामक झाले. त्यांच्या आक्रामक भुमिकेमुळे अखेर त्या काउंटरवरील व्यवहार दुसऱ्या कर्मचा-याकडे देण्यात आला. त्यानंतर कारभार सुरळीत सुरू झाला. मात्र खूप वेळापर्यंत पोस्ट आॅफीसमधील कारभार कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ठप्प पडला होता. यानंतर नागरिक, ज्येष्ठ नागरिकांची अशाप्रकारे गैरसोय झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विश्वकर्मा यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)