‘रोहयो’ सर्वाधिक भ्रष्टाचारी योजना!
By Admin | Updated: December 9, 2015 00:30 IST2015-12-09T00:30:18+5:302015-12-09T00:30:18+5:30
‘एसीबी’कडून शिक्कामोर्तब : इंदिरा आवास दुसऱ्या क्रमांकावर

‘रोहयो’ सर्वाधिक भ्रष्टाचारी योजना!
प्रदीप भाकर अमरावती
राज्य शासनाकडून राबविले जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये रोजगार हमी योजना भ्रष्टाचारात अग्रमानांकित ठरली आहे. इंदिरा आवास योजनाही भ्रष्टाचारत बरबटल्याचे उघड झाले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यातील ४० योजना कार्यालयाशी संबंधित असलेल्या सापळ्याप्रकरणी वार्षिक गोषवारा जाहीर केला आहे. रोजगार हमी योजना, इंदिरा आवास योजना, घरकूल योजना या पहिल्या तीन क्रमांकाच्या भ्रष्टाचारी योजना ठरल्या आहेत. सन २०१४ आणि २०१५ या दोन वर्षांत ४० योजनेशी निगडित १३६ सापळे रचण्यात आले. २०१४ मध्ये ८५ तर २०१५ मध्ये ५१ सापळे यशस्वी करण्यात आले.
या ४० योजनांमध्ये पाणीपुरवठा, आम आदमी विमा योजना, जीवनदायी योजना, शेळीपालन, एकात्मिक बालविकास, अपंगवित्त महामंडळ, दलित वस्ती सुधार योजना, ग्रामस्वयं रोजगार योजना, महिला बचतगट, पाणलोट विकास कार्यक्रम, आदिवासी योजना, अंत्योदय, भाग्योदय, वीज भांडवल योजना, कामगार विमा योजना, गारपीट योजना, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान आदींचा समावेश आहे.
रोजगार हमी योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविली जाते. ग्रामपंचायत स्तरावर जॉबकार्ड आदी प्रक्रिया त्यासाठी पार पाडल्या जातात. यातील वेतन काढण्यासाठी तथा देयके करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाचेची देवाण-घेवाण केली जात आहे. ग्रामीण भागात तर योजनेतील लाचखोरीमुळे या योजनेला ‘रोजगार हमी-अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ असे म्हटले जाते.
दोन वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २७ सापळे यशस्वी केल्याच्या पार्श्वभूमिवर रोहयोमधील सर्वाधिक लाचखोरीवर एसीबीने शिक्कामोर्तबच केले आहे. इंदिरा आवास योजनेमध्ये दोन वर्षांत १९, तर त्यामागोभाग घरकूल योजनेमध्ये १४ लाचखोरांना एसीबी खात्याने जेरबंद केले आहे. (प्रतिनिधी)