रिव्हॉल्व्हरच्या धाकावर १० लाख रुपये लुटले
By Admin | Updated: July 6, 2015 00:08 IST2015-07-06T00:08:41+5:302015-07-06T00:08:41+5:30
स्थानिक राजापेठ येथील रहिवासी राजेंद्र कंलत्री यांच्या घरात शिरून त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून....

रिव्हॉल्व्हरच्या धाकावर १० लाख रुपये लुटले
राजापेठ चौकातील घटना : आरोपीचे स्केच तयार
अमरावती : स्थानिक राजापेठ येथील रहिवासी राजेंद्र कंलत्री यांच्या घरात शिरून त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून १० लाखांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजता घडली. कंलत्री हे वैद्यकीय व्यवसायी आहेत. सदैव गजबजलेल्या या चौकात झालेल्या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. राजापेठ पोलिसांनी आरोपीचे स्केच तयार करुन तपासकार्य सुरु केले आहे.
राजापेठ चौकालगत हाकेच्या अंतरावर राजेंद्र गोपीकिशन कंलत्री यांचे घर आहे. रविवारी सकाळी राजेंद्र कंलत्री घरात झोपले होते. त्यांच्या पत्नी घराच्या आवारात पाणी भरत होत्या. दरम्यान अकस्मात तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञात इसमाने राजेंद्र यांच्या घराच्या मागच्या दाराने थेट बेडरूममध्ये प्रवेश केला. निद्रिस्त असलेले राजेंद्र कलंत्री यांच्या कानशिलावर रिव्हॉल्व्हर रोखून घरातील पैसे देण्याची मागणी केली. रिव्हॉल्व्हर पाहून घाबरलेल्या राजेंद्र यांनी घरातील १० लाखांची रोख अज्ञात इसमाच्या स्वाधीन केली. अज्ञाताने ती रोख बॅगमध्ये टाकून घरातून पलायन केले. तो इसम त्यानंतर राजापेठकडून राजकमलकडे निघून गेल्याचे कलंत्री यांचे म्हणणे आहे. स्थानिक भाजप कार्यालयापर्यंत तो अज्ञात इसम पायी गेल्यानंतर दिसेनासा झाल्याचे राजेंद्र कंलत्री यांनी पोलिसांना सांगितले.
आरोपीचे स्केच तयार
राजेंद्र कलंत्री यांनी पोलिसासमोर सांगितलेल्या आरोपीच्या वर्णनाच्या आधारे आयुक्तालयातील सायबर सेलमध्ये आरोपीचे स्केच तयार करण्यात आले. आरोपीने तोंडाला रुमाल बांधला होता. त्या वर्णनाचे स्केच पोलिसांनी तयार केले आहे. ही अज्ञात व्यक्ती संपत्तीच्या खरेदी-विक्री व्यवहारासंदर्भात १० ते १५ दिवसांपूर्वी घरी आल्याचेही आरोपीच्या देहबोलीवरून लक्षात आल्याचे कलंत्री यांनी पोलिसांना सांगितले.
सीसीटीव्ही
फुटेजची तपासणी
कलंत्री यांच्या घराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे पोलिसांनी राजापेठ ते राजकमल मार्गावरील काही प्रतिष्ठानांंमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे.
ंतक्रारकर्त्याच्या घराजवळील काही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. गुन्हेगार कोण व तो कोणत्या दिशेने गेला, याचा शोध घेतला जात आहे. चौकशीनंतर सर्व बाबी निष्पन्न होतील.
- मिलिंद पाटील,
सहायक पोलीस आयुक्त.