कारवाईच्या धाकाने महामार्गावरच टाकली रेती!
By Admin | Updated: June 27, 2015 00:13 IST2015-06-27T00:13:10+5:302015-06-27T00:13:10+5:30
मंगळवारी रात्री आठ वाजता दरम्यान रेती घेऊन जाणाऱ्या टिप्पर चालकाने पुढ पोलिसांची कारवाई सुरु असल्याचे ....

कारवाईच्या धाकाने महामार्गावरच टाकली रेती!
रेतीमाफियांची घाबरगुंडी : अनेक वाहनधारकांचे किरकोळ अपघात
वरुड : मंगळवारी रात्री आठ वाजता दरम्यान रेती घेऊन जाणाऱ्या टिप्पर चालकाने पुढ पोलिसांची कारवाई सुरु असल्याचे पाहून चक्क राज्य महामार्गावर महात्मा फुले महाविद्यालयासमोरच रेती टाकून पळ काढल्याची घटना घडली. परंतु या रेतीवरुन अंधारात वाहने जात असताना अनेकांना घसरून पडावे लागले, हे विशेष. प्रशासनाची यंत्रणा कूचकामी ठरल्याने अखेर नागरिकांनी रेती उचलून बाजूला ठेवल्याने संभाव्य अपघात टाळता आले.
मध्यप्रदेशातून ओव्हरलोड रेतीची वाहतूक मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. याकरिता अनेकांनी तक्रारी केल्यात. मात्र, रेतीची वाहतूक सुरुच आहे. परंतु २३ जून रोजी महसूल विभागाने कारवाई करुन रेती वाहतूकदारांना सळो की पळो करुन सोडले होते. या कारवाईचा धसका घेऊन रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान मोर्शीकडे जाणाऱ्या एका रेतीच्या टिप्परने पोलिसांद्वारे टिप्परची तपासणी होत असल्याची माहिती माहिती मिळताच टिप्परमधील रेती राज्य महामार्गावर टाकून पळ काढला. या रेतीमुळे अनेक दुचाकीस्वार वाहनांसह घसरून पडलेत. यावेळी वरुडचे नगरसेवक तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर माहोरे यांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाला माहिती देऊन तातडीने उपायायोजना करण्याचे सुचविले. परंतु बांधकाम विभागाने ही बाब नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात असल्याचे सांगितले.
अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना माहिती देताच तहसीलदार बाळासाहेब तिडके घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत शिकलकरी मोहल्यातील नागरिकांनी रेती बाजूला केली. यामुळे रस्ता वाहतुकीस खुला झाला. प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र एक तासानंतर घटनास्थली पोहोचले, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)