दोन महिन्यांत रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 23:46 IST2017-08-11T23:45:36+5:302017-08-11T23:46:42+5:30

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तब्बल सात कोटी रूपये खर्चून तयार केलेल्या ....

Road sideways in two months | दोन महिन्यांत रस्त्याची चाळणी

दोन महिन्यांत रस्त्याची चाळणी

ठळक मुद्देनिकृष्ट साहित्य : मेळघाटात प्रधानमंत्री सडक योजनेला भ्रष्टाचाराची कीड

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तब्बल सात कोटी रूपये खर्चून तयार केलेल्या तालुक्यातील काटकुंभ ते घाणा या रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघड झाल्याचे चित्र आहे. दोन महिन्यांतच काँक्रीट रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत काटकुंभ ते घाणा गावापर्यंत जवळपास १५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम ७ आॅगस्ट २०१४ पासून सुरू करण्यात आले. दीड वर्षे निधीअभावी काम बंद ठेवण्यात आले. सहा कोटी ९० लक्ष रूपयांच्या रस्ता कामात आठ किलोमीटर डांबरीकरण, तर सात किलोमीटर काँक्रीटीकरण लहान, मोठे पूल, नाली आदींचा समावेश आहे.
मध्यप्रदेशच्या भैसदेही येथील आर.एस. किल्लेदार नामक कंत्राटदार रस्त्याचे काम करीत असून मेळघाटातील जवळपास सर्वच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे या एकाच कंत्राटदारामार्फत पूर्ण केली जात असल्याचे सत्य आहे. आपले राजकीय वजन वापरून नाममात्र निविदांचा देखावा आणि कामे बळकाविण्याचा हातखंडा असल्याचे सर्वश्रृत आहे. परिणामी अधिकाºयांशी संगनमत करून निकृष्ठ कामांची मालिकाच मेळघाटात सुरू करण्यात आल्याचे सत्य आहे.यामुळे मेळघाटातील विकासकामांचा दर्जा राखण्यात अपयश येत असल्याची ओरड येथील नागरिक करीत असतात. सदर कंत्राटदाराने केलेल्या कामाची चौकशी करून कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी देखील केली जात आहे.
काँक्रीट रस्त्यावर काटकुंभात खड्डा
गत दोन महिन्यांपूर्वी काटकुंभ ते घाणा रस्त्याचे काँक्रीटचे काम करण्यात आले. काटकुंभच्या मुख्य चौकात रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याचे चित्र अपघाताला निमंत्रण देणारे ठरले आहे. उर्वरित रस्त्यांमध्ये निकृष्ट साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर संबंधित कंत्राटदाराने अधिकाºयांच्या संगनमताने केला. परिणामी वेळेपूर्वीच डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाच्या रस्त्यामधील भ्रष्टाचार आता बोलू लागला आहे. संबंधित कंत्राटदाराचे प्लँट भैसदेही येथे आहे. परिसरातील नागरिकांना नेहमी भैसदेही येथे ये-जा करावी लागते. त्यामुळे कुणीच या अपहाराबद्दल बोलण्यास धजावत नाही, हे विशेष.

पाच वर्षे रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. दीड वर्षे काम निधीअभावी बंद होते. एकूण ६ कोटी ९९ लक्ष रूपये खर्चून १५ किमी रस्ता तयार करण्यात आला आहे. नादुरूस्त रस्ता कंत्राटदाराकडून दुरूस्त करून घेऊ.
- अरविंद गावंडे, उपअभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना

Web Title: Road sideways in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.