रस्ते खड्डयात, पैसा पाण्यात !

By Admin | Updated: August 5, 2016 00:17 IST2016-08-05T00:17:59+5:302016-08-05T00:17:59+5:30

शहरातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांवर ठिंकठिकाणी खड्डे पडल्याने ये-जा करताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.

Road pits, money in water! | रस्ते खड्डयात, पैसा पाण्यात !

रस्ते खड्डयात, पैसा पाण्यात !

नगरपंचायतीचे दुर्लक्ष : नागरिकांचे प्रचंड हाल
मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वर
शहरातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांवर ठिंकठिकाणी खड्डे पडल्याने ये-जा करताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. मागील दोन महिन्यांपासून नागरिकांना जणू अडथळ्यांची शर्यतच पार करावी लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र नगर पंचायत प्रशासन दृष्टिहीन झाल्याने या रस्त्यांसाठी आतापर्यंत खर्च केलेला पैसा पाण्यात गेल्याची चर्चा आहे.
शहरातील कॉलनी परिसरातील व गावातील अंतर्गत रस्ते चिखलमय झाले आहेत. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शाळेच्या वेळेत या रस्त्यांवर प्रचंड गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांची या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना तारांबळ उडत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करणे गरजेचे होते. परंतु नगर पंचायतीच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना मरणयातना सहन करावी लागत आहे. या रस्त्यांवरील गड्ड्यात मुरूम टाकला गेला असता किंवा ज्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी गिट्टी टाकून डागडूजी केली असती तर नागरिकांचा त्रास टळला असता. खड्ड्यांमुळे अनेकांना कंबरेचे आजार जडले आहेत.
दुचाकीस्वारांना खड्ड्यांमुळे किरकोळ दुखापती झाल्या आहेत. नालीवर टाकलेले रपटे फुटल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. प्रत्येक वॉर्डांत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव धोक्यात घालून नागरिकांना वाहन चालवावे लागत आहे. परंतु नगर पंचायत प्रशासन व सत्ताधारी झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र आहे. कॉलनी परिसरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. सव्वालाखे कॉम्प्लेक्स ते छतेरिया ले-आऊट, देशमुख इंजिनियरिंग वर्कशॉप ते जैन ले-आऊटपर्यंत या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने व अंतर्गत रस्त्यांवर चिखल झाल्याने परिसरातील विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे. ६ महिन्यांपासून नागरिकांना नाहक त्रात होत असताना नगर पंचायत सत्ताधाऱ्यांमध्ये आस्था नसणे ही शोकांतिका आहे. यामुळे या शहराची खड्ड्यांचे शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये?

 

Web Title: Road pits, money in water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.