रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीसाठी करार
By Admin | Updated: March 2, 2017 00:10 IST2017-03-02T00:10:57+5:302017-03-02T00:10:57+5:30
राज्यातील रस्ते निर्मितीची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी १० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे वार्षिक देखभाल करार करण्यात यावा, ...

रस्त्यांची देखभाल, दुरुस्तीसाठी करार
चंद्रकांत पाटील : सार्वजनिक बांधकाम विभागात आढावा बैठक
अमरावती : राज्यातील रस्ते निर्मितीची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी १० कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे वार्षिक देखभाल करार करण्यात यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री प्रवीण पोटे, प्रधान सचिव आशिष सिन्हा, सचिव ए. ए.सगने, सी. व्ही. तुमाने, सी. पी. जोशी, तांत्रिक संल्लागार मिलींद आचार्य, प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता सी. व्ही. तुंगे यांच्यासह विभागातील सर्व सहा. मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या अधिपत्त्यातील रस्त्यांची निर्मिती गुणवत्तापूर्ण पध्दतीने करण्यासाठी उत्तम काम करणाऱ्या कंत्राटदारांची निवड करावी. परवान्याची अट शिथील करुन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना रस्त्याची कामे द्यावीत. पारदर्शक प्रणाली अवलंबविण्यासाठी तीन लाखांच्या वरील कामांचे ई-टेंडरींग करावे. तीन लाखांच्या खालील ईस्टीमेटला मंजूरी कामांचा दर्जा व डिपीआरची तपासणी करुन द्यावे. डिपीआर तयार करताना नियमातील सर्व मापदंडाच्या अनुषंगाने खऱ्या उतरणाऱ्या कंत्राटरांना रस्ते बांधकामाची कामे द्यावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यापेक्षा त्यावरील पॅचेस उकरुन नव्याने रस्ता तयार करावा. पुढील पाच वर्षाचे रस्ता दुरुस्ती व देखभाल करार विहीत मुदतीत करावा. १० कि.मी. लांबीच्या परिघातील रस्ता दुरुस्ती-निर्मितीचे कामे गुणवत्तापूर्ण करणे व तपासणीची जबाबदारी कार्यकारी अभियंताची राहील, ना. पाटील यांनी स्पष्ट केले.